भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 12:55 PM2022-09-26T12:55:17+5:302022-09-26T13:33:45+5:30

पत्रकार परिषदेतून विरोधकांवर साधला निशाणा

bjp state head chandrashekhar bawankule criticized maha vikas aghadi | भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

Next

वर्धा : गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार फेसबुक लाईव्ह आणि टोमणे सभेमध्येच व्यस्त राहिले. त्यामुळे विकास कामांना मोठी खीळ बसली असून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्ते असंतुष्ट आहे. त्यामुळे आता त्यांची भाजपामध्ये इनकमिंग सुरू झाली असून भाजपाच्या प्रत्येक बुथवरून अशांचे आम्ही स्वागत करीत आहोत, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती देशभरात साजरी केली जात असून महाराष्ट्रातील ९७ हजार ५०७ बुथवर हा जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान, वैद्यकीय शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम राबविले जात आहे. अजून सात दिवस बाकी असून या दिवसांत दिव्यांगाकरिता वयश्री योजना राबविली जाणार आहे, असे सांगून बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांवर सडकून टीका केली.

महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये निराशाजनक वातावरण असून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्ध्यातील माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे व कामगार संघटनेचे नेते उमेश अग्निहोत्री यांचाही भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, राजेश बकाने, मिलिंद भेंडे, प्रशांत बुरले, भाजपयुमोचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, अंकुश ठाकूर यांची उपस्थिती होती.

शिंदे-फडणवीस सरकार एकत्र निवडणुका लढणार

महाविकास आघाडीला सोडून भाजपात येणाऱ्यांचा मान सन्मान केला जाईल. आता येत्या अडीच वर्षामध्ये विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी योजना तयार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपा युतीने लढणार असून विजयीही खेचून आणू, अशा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

शासनाने शेतकऱ्यांच्या दु:ख जाणलं - कुणावार

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर निकषाच्या चौकटीबाहेर पडून जिल्ह्याला ३६४ कोटी ६५ लाखांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला. तातडीने खावटीचा निधी देत मोठा आधार दिला. सर्वाधिक निधी हिंगणघाट तालुक्याला मिळाला असून या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख जाणले, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केलं.

Web Title: bjp state head chandrashekhar bawankule criticized maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.