महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी भाजप करते ईडीचा वापर : जोगेंद्र कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 11:47 AM2022-04-06T11:47:54+5:302022-04-06T11:54:33+5:30
राजकीय पुढाऱ्यांना तपास यंत्रणांच्या जाळ्यात गुंतवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा हा डाव भाजपचा असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार याला चांगलेच प्रतिउत्तर देत आहे.
वर्धा : महाराष्ट्रातील थोर महापुरुषांनी देशाला दिशा दिली. त्यामुळे महाराष्ट्राचे जगात एक वेगळे महत्त्व आहे. पण येथे भाजप सत्तेवरून पायउतार होताच ईडी आणि सीबीआयचा वापर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासह महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी भाजपकडून केला जात असल्याचा आरोप माजी खासदार तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आयोजित पत्रपरिषदेतून केला.
कवाडे म्हणाले, सीबीआय आणि ईडी या केंद्रीय यंत्रणा आहे. पण या दोन्ही यंत्रणांचा वापर केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी करीत आहे. इतकेच नव्हे तर ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्याही ठिकाणी भाजप या दोन्ही यंत्रणांचा वापर करून अस्थिरतेचे वातावरण निर्माण करू पाहत आहे. राजकीय पुढाऱ्यांना तपास यंत्रणांच्या जाळ्यात गुंतवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा हा डाव भाजपचा असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार याला चांगलेच प्रतिउत्तर देत आहे. थोर महापुरुषांचा हा महाराष्ट्र असून तो कुठल्याही दबावाला झुकणार नाही असे याप्रसंगी कवाडे यांनी स्पष्ट केले.
किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी
पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा महाविकास आघाडीचा एक घटक आहे. पण अद्यापही मित्र पक्षांची समन्वय समिती अद्यापही गठित करण्यात आलेली नाही. ही समिती वेळी गठित करून महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकहितार्थ असलेला किमान समान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी याप्रसंगी जोगेंद्र कवाडे यांनी केली.
राज्यात बौद्धांसह दलितांवरील अत्याचारांत वाढ
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील बौद्ध आणि दलितांवर जास्त अत्याचार होत असल्याचा अहवाल नॅशनल क्राईम रिपोर्टच्या माध्यमातून पुढे आला आहे. ही चिंतेची बाब आहे. या अहवालानुसार बौद्धांसह दलितांवरील अत्याचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तृतीय क्रमांकावर असून अत्याचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मागील अडीच वर्षांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेतील राज्याच्या दक्षता समितीची बैठक झालेली नाही, असेही याप्रसंगी जोगेंद्र कवाडे म्हणाले.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने द्यावी
मागील दोन वर्षांपासून राज्यातील विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात आलेली नाही. पण महाविकास आघाडी सरकार आमदारांना घर देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाने विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्तीची रक्कम अदा करावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
निवडणुका स्वबळावर लढणार
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका पीपल्स रिपब्लिकन पार्टी स्वबळावर लढणार आहे. असे असले तरी निवडणुका लढताना रिपब्लिकनच्या विविध गटांना एकत्र आणण्याचाच प्रयत्न होणार असल्याचे याप्रसंगी जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केले.