भाजपाची ओबीसींवर नजर, मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागणार? विस्ताराकडे लागल्या नजरा
By रवींद्र चांदेकर | Published: June 18, 2024 05:06 PM2024-06-18T17:06:51+5:302024-06-18T17:07:29+5:30
पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?
पॉलिटिकल वाॅर: रवींद्र चांदेकर
वर्धा : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर पक्षात ‘विचारमंथना’ला जोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा भाजपला फटका बसल्याचे निष्कर्ष काढले जात आहेत. त्यामुळे भाजपने आता ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे. त्यातून संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या ओबीसी आमदारांना सामावून घेतले जाण्याचे संकेत आहेत. यात विदर्भातून अकोल्याचे रणधीर सावरकर आणि वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या नवख्या उमेदवाराने भाजपच्या पहेलवानाचा पराभव केला. या पराभवाचे चिंतन करण्यासाठी मुंबईत भाजपने बैठकी घेतल्या. पराभवाचे ‘आत्मचिंतन’ सुरू केले. ९ जूनला भाजप आमदारांच्या बैठकीनंतर १४ जूनला मुंबईत पराभूत उमेदवार, भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत भाजपच्या पराभवाचे कारण काय, आपण का हरलो, यावर चर्चा करून कोणते मुद्दे पराभवास कारणीभूत ठरले, यावर विचारमंथन करण्यात आले.
या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा कितपत फटका बसला, यावरही सांगोपांग चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाज पक्षापासून दुरावू नये म्हणून खास ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय झाल्याचेही समजते. ओबीसी समाजाला पक्षासोबत मोठ्या प्रमाणात जुळवून ठेवण्यासाठी भाजप ओबीसी आमदारांना जादा ताकद देणार असल्याची माहिती आहे.
पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. या विस्तारात शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना सामावून घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या जादा आमदारांना मंत्रिमंडळात सामावून न घेता केवळ त्यांच्यात मंत्रिपदांची अदलाबदल होणार असल्याचेही सांगण्यात येते. शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचे सांगितले जाते. त्यात भाजपने ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित करून ओबीसी आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक १०५ आमदार आहेत, हे विशेष.
भाजपने ओबीसी आमदारांना मंत्रिपदाची संधी दिल्यास अकोल्यातून रणधीर सावरकर आणि वर्धेतून डॉ. पंकज भोयर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वर्धा जिल्ह्यात चारपैकी भाजपचे तीन आमदार आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कुणालाच मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांकरिता का होईना, एखाद्या आमदाराला मंत्रिपद मिळावे, अशी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही अपेक्षा आहे.
मंत्रिपद ठरणार औट घटकेचे
जिल्ह्यातून कुणालाही मंत्रिपदाची लॉटरी लागली तरी त्यांचे मंत्रिपद औट घटकेचे ठरणार आहे. येत्या ऑक्टोबरअखेरीस विधानसभा निवडणूक हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आदर्श आचारसंहिता लागू हाेईल. आता जून महिन्याच्या संपण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणालाही मंत्रिपदाची लॉटरी लागल्यास नवीन मंत्र्यांना केवळ जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे काही दिवस, असे एकूण केवळ अडीच महिने काम करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, अडीच महिने का होईना त्यांना लाल दिवा घेऊन मिरविता येणार आहे.
पक्ष निरीक्षकांचा अहवाल ठरणार महत्त्वाचा
भाजपने लोकसभेतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी आमदार प्रवीण दटके यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून २२ जूनपूर्वी प्रदेशाध्यक्षांना अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, लोकसभेत विजयी उमेदवाराला वर्धा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतांची आघाडी मिळाली होती. ही बाब आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. पक्ष निरीक्षक आपल्या अहवालात नेमक्या कोणत्या बाबी ‘हायलाईट’ करतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यांचा अहवाल सकारात्मक असल्यास ओबीसी प्रवर्गातील तरुण चेहरा म्हणून डॉ. भोयर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.