राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादनासाठी भाजपची पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:56 PM2018-09-29T23:56:27+5:302018-09-29T23:56:58+5:30
भारतीय जनता पार्टीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार २ आॅक्टोबरला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक येथून निघणार असून त्याचा समारोप महात्मा गांधी पुतळा वर्धा येथे होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतीय जनता पार्टीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार २ आॅक्टोबरला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक येथून निघणार असून त्याचा समारोप महात्मा गांधी पुतळा वर्धा येथे होणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे. या पदयात्रेत सुमारे ५ हजार नागरिक सहभागी होतील, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत खा. रामदास तडस यांनी दिली.
खा. तडस पुढे म्हणाले, २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांची १४९ वी जयंती तसेच १५० व्या जयंती वर्ष निमित्ताने राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यात विविध विकास कामांच्या भूमिपुजनाचा समावेश आहे. तर काही इमारतींचे लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच हस्ते जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण होणार आहे. ना. मुनगंटीवार हे सेवाग्राम येथील प्रार्थनेला उपस्थित राहणार असून त्यानंतर वरुड भागातील सभागृह आणि जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण करतील. त्यानंतर त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय व नवीन नियोजन भवनाच्या कामाचा श्रीगणेशा होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला आ. डॉ. पंकज भोयर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, अविनाश देव, सुनील गफाट, अर्चना वानखेडे, जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे, सेलू तालुका अध्यक्ष अशोक कलोडे आदींची उपस्थिती होती.
लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीसाठी प्रयत्न : पंकज भोयर
सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून सेवाग्राम परिसरात जगातील सर्वात मोठ्या चरखा उभारण्यात आला आहे. याची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. २ आॅक्टोबरला काँग्रेसचे पुढारी सेवाग्राम येथे येत असले तरी आमची कुणाशी स्पर्धा नाही. पूर्वीच्या सरकारने सेवाग्राम विकास आराखड्याला ‘गांधी फॉर टुमारो’ हे नाव दिले होते. परंतु, त्या सरकारने त्यासाठी निधीची तरतूद केली नव्हती. आम्ही ‘गांधी फॉर टुमारो’चे केवळ ‘सेवाग्राम विकास आराखडा’ असे नामकरण करून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देत प्रत्यक्ष काम पूर्ण करीत आहो, असा चिमटा भाजपाचे आ. डॉ. पंकज भोयर यांनी पूर्वीच्या काँग्रेस सरकारला घेतला.