भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:31 PM2019-08-04T21:31:47+5:302019-08-04T21:32:11+5:30
येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील राजकीय वाद विकोपाला जाऊन तलवारीने मारहाण करण्यात आली. यात एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना स्थानिक विठ्ठल वॉर्डात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. ललित विजय मेश्राम (२८) रा. विठ्ठल वॉर्ड, असे जखमीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील राजकीय वाद विकोपाला जाऊन तलवारीने मारहाण करण्यात आली. यात एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना स्थानिक विठ्ठल वॉर्डात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. ललित विजय मेश्राम (२८) रा. विठ्ठल वॉर्ड, असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नितेश मेश्राम आणि भाजपाचे न. प. आरोग्य सभापती रामू राठी हे एकाच राजकीय पक्षात आहेत. त्यांच्यात राजकीय गटबाजीच्या कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अशातच नितेश मेश्राम व भाजपाचे पदाधिकारी रामू राठी या दोघांची शनिवारी रात्री ११ वाजता येथील न्यायालयासमोर शाब्दीक चकमक झाली. तेथून सदर दोघेही गेल्यावर बाल्या वानखडे, अमित शिंगणे, पुनीत छांगानी, रामू राठी, सुमित शिंगणे, सुनील सारसर, नाना गिरोले, कार्तिक कारमोरे, मंगेश लाडके यांनी नितेश मेश्राम यांच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी नितेशचा भाऊ ललित मेश्राम हा सुरूवातीला घराबाहेर आला.
त्याने रामू राठी व सर्वांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाल्या वानखेडे, पुनीत छांगाणी, अमित शिंगाने व इतरांनी नीतेश मेश्राम याला तलवारीने मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याने तेथून पळ काढला. अशातच मध्यस्थी करीत असलेल्या ललित याला आरोपींनी तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास आर्वीचे ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गोपाळ ढोले करीत आहेत.
दोघे ताब्यात तर सात आरोपी फरार
सदर प्रकरणी नितेश विजय मेश्राम याच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे. शिवाय पोलिसांनी कार्तिक कारमोरे व सुमित शिंगणे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील सात आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतल्या जात आहे.