भाजपचे जनसंपर्क कार्यालय गर्दीने फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:43 PM2019-05-23T23:43:19+5:302019-05-23T23:45:13+5:30
लोकसभा मतदारसंघाचे निकाल हळूहळू बाहेर पडताच भाजप आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले अन् जनसंपर्क कार्यालय गर्दीने गजबजलेले दिसून आले. दरम्यान, कार्यालयात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांचे नागपूर मार्ग स्थित दादाजी धुनिवाले चौक परिसरात जनसंपर्क कार्यालय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा मतदारसंघाचे निकाल हळूहळू बाहेर पडताच भाजप आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले अन् जनसंपर्क कार्यालय गर्दीने गजबजलेले दिसून आले. दरम्यान, कार्यालयात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांचे नागपूर मार्ग स्थित दादाजी धुनिवाले चौक परिसरात जनसंपर्क कार्यालय आहे. एरवीही या कार्यालयात रेलचेल पाहायला मिळते. गुरुवारी मतमोजणी असल्याने सकाळपासूनच जनसंपर्क कार्यालयात पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होती. कार्यालयात आलेल्या कर्मचाºयांकडून बडदास्त करणे सुरू होते. कार्यालयापुढील रस्ता आणि परिसर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चारचाकी, दुचाकी वाहनाने फुलून गेला होता.
जनसंपर्क कार्यालय पदाधिकाºयांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. मात्र, बसायला जागा अपुरी पडत असल्याने कित्येक जण अंगणात खुर्ची टाकून मोबाईलवर निकाल पाहत होते. याशिवाय कार्यालयात असलेले टीव्ही, संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून निकालाकडे उपस्थित पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते लक्ष लावून होते. तर काही पदाधिकारी मतमोजणीच्या ठिकाणी असलेल्या प्रतिनिधींच्या संपर्कात राहत कितवी फेरी आहे, कितीने पुढे आहे, अशी विचारणा करीत होते. किती मताधिक्याने विजयी होणार, म्हणून कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. तसेच मतदारसंघनिहाय प्रत्येक फेरीत मिळालेल्या मतदानावरून आकडेमोड करताना दिसून आले. कोठे शत-प्रतिशत मते मिळाली, याचीही पक्षातील पदाधिकारी कारणमिमांसा करीत होते. हळूहळू निकालाचा कौल भाजपच्या बाजूने दिसताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपक्षाच्या पदाधिकाºयांनी जनसंपर्क कार्यालय गाठले. कार्यालयात आमदार डॉ. पंकज भोयर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्यासह जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, विविध समितीच्या सभापतींनीही हजेरी लावली. कार्यालयात चहा-पाण्यासोबतच भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
असा वाढत गेला कार्यकर्त्यांचा उत्साह
गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून भारतीय खाद्य निगममध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान मतमोजणीच्या दुसºया-तिसºया फेरीपासूनच रामदास तडस आघाडीवर असल्याचे निदर्शनास येताच कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. चवथ्या आणि पाचव्या फेरीनंतर मताधिक्य वाढतच गेल्याने अनेक कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनेकांनी मिठाई बोलावून एकमेकांचे तोंड गोड गेले. इतक्या मताधिक्याने साहेब विजयी होतील, अशीही दावेदारी केली.