रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:16 AM2017-10-12T01:16:13+5:302017-10-12T01:16:26+5:30
रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया एकाला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक मोबाईल, चार हजार रोख व रेल्वेची एक तिकीट जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया एकाला वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक मोबाईल, चार हजार रोख व रेल्वेची एक तिकीट जप्त केली. श्रीकांत सत्यनारायण नारे (५४) रा. वर्धा, असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
सणांच्या दिवसांत रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे सक्रिय होतात. रेल्वे सुरक्षा बलाकडे असलेल्या माहितीच्या आधारे काही रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºयांवर लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारा श्रीकांत वर्धा रेल्वेस्थानक भागातील नव्याने तयार झालेल्या काऊंटरवर तिकीट घेण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.
यावरून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून पूर्ण-वर्धा अशी वातानुकूलीत डब्यातून प्रवास करण्यासाठी वापरण्यात येणारी रेल्वे तिकीट, रोख ४ हजार १६० रुपये व एक मोबाईल जप्त केला. अटकेतील आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ सुरक्षा मंडळ आयुक्त ज्योतीकुमार सतीजा, वर्धा रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणेदार सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिनेशसिंग, पंकज खटाले, अतुल सावंत आदींनी केली.
दोन दिवसांपूर्वी ठोकल्या दोघांना बेड्या
दिवाळी हा मुख्य सण काही दिवसांवर आहे. याच दिवसांमध्ये रेल्वे तिकीटांचा काळाबाजार होतो. यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची कंबर कसली आहे. दोन दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाºया अशोक शाजुमल बुधरानी याला वर्धेतून तर आकाश तायडे याला धामणगाव (रेल्वे) येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काही साहित्य व रोख रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जप्त केल्याचे सांगण्यात आले.
दिवाळीच्या तोंडावर एजंटांकडे गर्दी वाढली
दिवाळी साठी देशभरातून प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाही. अशा परिस्थितीत एजंटांकडून तत्काळ तिकीट काढून घेतले जाते. एजंट एका तिकीट मागे २०० ते ५०० रुपये घेतो त्यामुळे एजंटाचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. रेल्वे प्रशासनही अशा एजंटाना सहकार्य करीत असल्याचे बोलल्या जात आहे.