बनावट ऑनलाइन सेंटरमधून कागदपत्रांचा काळाबाजार; कारवाईअंती धक्कादायक प्रकार उजेडात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:52 PM2023-08-18T12:52:27+5:302023-08-18T12:54:09+5:30
लॅपटॉपसह महागडी कारही केली जप्त, विद्यार्थ्यांना दिले बोगस प्रमाणपत्र
वर्धा : शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी असलेले बनावट कागदपत्रं तयार करून नागरिकांना ते अवाच्या सवा शुल्क आकारुन देणाऱ्या बनावट व्ही.एस. ऑनलाइन सर्व्हिस सेंटरचा काळाबाजार उजेडात आला. याप्रकरणी महसूल विभागासह पोलिसांच्या चमूने ऑनलाइन सेंटरवर कारवाई करून चौघांना अटक करीत. बनावट कागदपत्रांसह लॅपटॉप आणि महागडी कार असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १:३० ते २ वाजताच्या सुमारास प्रशासकीय इमारतीच्या समोरील रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यांत ऑनलाइन सेंटर चालक विकास कुंभेकर रा. अमरावती याच्यासह त्याची पत्नी आणि दोन ऑपरटेर अशा चौघांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, नितीन मुकुंद सुळे रा. बॅचलर रोड वर्धा याने प्रशासकीय इमारतीच्या समोरील रस्त्यालगत असलेल्या व्ही.एस. ऑनलाइन सर्व्हिस सेंटरमधून उत्पन्नाचा दाखला काढला होता. त्याने महाविद्यालयात दाखला दिला असता महाविद्यालयीन प्रशासनाने केलेल्या पडताळणी दरम्यान उत्पन्नाचा दाखला बनावट असल्याचे सांगितल्या गेले. नितीनने ही बाब त्याचे वडील मुकुंद सुळे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह पोलिसांना माहिती देत कारवाई करण्यास सांगितले. त्या आधारे महसूल विभागासह पोलिसांच्या चमूने ऑनलाइन सर्व्हिस सेंटरवर छापा मारला असता सेंटरमध्ये बनावट उत्पन्नाचा दाखला आणि एक बनावट शपथपत्र मिळून आले.
तहसीलदार रमेश कोळपे यांनी पंचनामा केला. पोलिसांनी ऑनलाइन सेंटरमधून तीन लॅपटॉप, दोन प्रिंटर, किबोर्ड, बॅटरी इन्व्हर्टरसह एक चारचाकी असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सेंटर चालक विकास कुंभेकरसह त्याची पत्नी आणि दोन संगणक चालकांना अटक केल्याची माहिती दिली. ही कारवाई तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत, अजय धर्माधिकारी, माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रकल्प व्यवस्थापक शेहजाद शेख, महाआयटीचे जिल्हा समन्वयक प्रतीक उमाटे यांनी केली. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहे.
तक्रार पाठविली थेट व्हॉट्सपवर
महाविद्यालयीन विद्यार्थी नितीन सुळे याचा उत्पन्नाचा दाखला बनावट निघताच त्याच्या वडिलांनी तो बनावट दाखला थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवून तक्रार दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी लगेचच दाखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
असा चालायचा येथे गोरखधंदा...
ऑनलाइन सेंटरमधून सर्वच शासकीय दस्ताऐवज काढण्यासाठी नागरिक जात होते. कुणी उत्पन्नाचा तर कुणी भूमीअभिलेख तर कुणी आरटीओ संदर्भातील दस्ताऐवज काढण्यासाठी जायचे. सेंटरचालक विकास हा कागदपत्रांवर शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी एडिट आणि कॉपी करून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कागदपत्रांवर पेस्ट करायचा. हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू असून आतापर्यंत अनेकांना शासकीय कागदपत्र सेंटरमधून देण्यात आलेले आहे. अखेर हा गोरखधंदा उजेडात येऊन अशा बनावट सेंटरचालकांना चाप बसला.
पाच ते सात सेंटरची केली तपासणी
व्ही.एस. ऑनलाइन सेंटरमधून बनावट कागदपत्रं जप्त केल्यानंतर परिसरात असलेल्या पाच ते सात ऑनलाइन सेंटरची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे बनावट कागदपत्रं आढळून आले नाही. हे सर्व सेंटर अनधिकृत असून याला कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही.