रेशनच्या तांदळाचा काळाबाजार, पुलगावात गोदामावर छापा; ८८ हजार किलो तांदूळ पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:03 PM2023-08-19T12:03:02+5:302023-08-19T12:05:03+5:30
तीन ट्रक जप्त : पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई
वर्धा : पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पुलगाव येथील तांदळाच्या गोदामावर छापा टाकून तीन ट्रकसह ४५ लाख ८६ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ८८ हजार १५५ किलो तांदूळ जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पुलगाव शहरातील महेश श्यामलाल अग्रवाल यांच्या मालकीच्या गोदामावर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने छापा टाकला. तेव्हा ट्रक क्रमांक सी.जी.०८ ए.एच.६६६४ चा चालक कोमलकुमार हरिराम साहू (३३) रा. रामपूर जि. राजनांदगाव आणि मालक अनुपसिंग भाटीया रा. डोगरगड यांच्या वाहनात ३१ हजार ५४० किलो तांदूळ आढळून आला. तसेच, ट्रक क्रमांक एम.एच.३० ए.व्ही. ०४२० चा चालक नरेश चंपत आंबेकर (४३) रा. शांतीनगर-वर्धा, मालक आशिष उल्हास चोरे रा. वर्धा यांच्या ट्रकमध्ये २५ हजार ७२० किलो आणि ट्रक क्रमांक सी.जी.०८ ए.ई.५४११ चा चालक किशोर कोंडू चौधरी (३५) रा. राजोली, जि.गोंदिया, मालक कुलदीपसिंग चरणजितसिंग भाटिया रा. राजनांदगाव जि. राजनांदगाव यांच्या ट्रकमधून ३० हजार ८९५ किलो तांदूळ होता. या तिन्ही ट्रकमधून पोलिसांनी १५ लाख ८६ हजार ७९० रुपयांचा ८८ हजार १५५ किलो तांदूळ आणि ३० लाख रुपये किमतीचे तीन ट्रक असा एकूण ४५ लाख ८६ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पुलगाव पोलिसांत जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गोदाम मालक महेश अग्रवाल यांच्यासह तिन्ही ट्रक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप गाडे, रोशन निंगोळकर, सागर भोसले, अभिजित गावडे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, प्रशांत आमनेकर यांनी केली.
रेशनच्या तांदळाचा काळाबाजार
जिल्ह्यात जवळपास साडेआठशे रेशन दुकाने असून या दुकानातून नेहमी चिल्लर व ठोक धान्याची विक्री होत असल्याची ओरड होत असते. महेश अग्रवाल यांच्या गोदामात सापडलेला तांदूळ हा स्वस्त धान्य दुकानातून चिल्लर विकत घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे रेशनच्या धान्याच्या काळ्या बाजारात अनेकांचे हात काळे झाले आहे. त्यामुळे कोणकोणत्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून या तांदळाची खरेदी करण्यात आली, याचीही चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई होणार का?
छत्तीसगडला जात होता तांदळाचा साठा
पोलिसांनी तिन्ही ट्रक चालकांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी हा तांदळाचा साठा महेश अग्रवाल यांच्या अभय ट्रेडिंग कंपनीतून आणल्याची कबुली दिली. हा सर्व तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून चिल्लर स्वरूपात खरेदी केल्याचे आढळून आले. तसेच, हा सर्व तांदूळ छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील राइस मिलमध्ये जात असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
लहान वाहनांचाही होता सहभाग
या गोदामावर तीन ट्रकसोबतच लहान मालवाहू आठ ते दहा वाहने होती. पोलिसांनी कारवाईदरम्यान ती सर्व वाहने पोलिस ठाण्यात आणून उभी केली. परंतु, त्या वाहनांचा या कारवाईत कुठेही उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात ठाणेदार दारासिंग राजपूत यांना विचारणा केली असता ती वाहने तपासात असून ते साक्षीदार किंवा आरोपीही होऊ शकतात, तो तपासाचा भाग आहे, असे त्यांनी सांगितले.
विनापरवाना खरेदी-विक्री
महेश अग्रवाल बऱ्याच दिवसांपासून तांदळाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या गोदामात मोठ्या प्रमाणात सरकारी स्वस्त धान्य दुकानातून खरेदी केलेला तांदळाचा साठा पोलिसांना आढळून आला. या तांदळाची साठवणूक किंवा खरेदी-विक्री करण्याबाबत अग्रवाल यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने केवळ स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता हा काळाबाजार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.