आर्वीतही ‘रेशनिंग’चा काळाबाजार, ४६ क्विंटल तांदळाचा साठा केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:14 PM2023-09-27T15:14:29+5:302023-09-27T15:22:27+5:30
पोलिसांची चाहुल लागताच काही वाहनचालकांनी तेथून पळ काढला. पण, चार वाहने पोलिसांना मिळून आली.
वर्धा : रेशनिंगच्या तांदळाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो हे सर्वश्रूत असतानाच आता आर्वी शहरातही रेशनिंगच्या तांदळाचा सुरू असलेला काळाबाजार उजेडात आला आहे. आर्वी पोलिसांनी २५ रोजी रात्रीच्या सुमारास चार मालवाहू वाहनांसह ४६ क्विंटल तांदूळ जप्त केल्याची माहिती दिली आहे.
आर्वी शहरातील व्यावसायिक संजय गोमासे याच्या गोदामासमोर मालवाहू वाहनांची रांग लागली होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ गोदामाजवळ छापा मारला असता मालवाहू वाहनात असलेल्या चुंगड्यांमध्ये रेशनिंगचा तांदूळ आढळून आला. पोलिसांनी मालवाहू वाहनचालकांस ताब्यात घेत चारही वाहनातून २,४०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे ४६ क्विंटल तांदूळ जप्त केला.
संजय गोमासे मोठा खिलाडी
आर्वीतील व्यावसायिक संजय गोमासे हा मोठा खिलाडी असून, मागील अनेक वर्षांपासून त्याचे रेशनिंगच्या तांदळाच्या काळाबाजारात हात काळे असल्याची माहिती आहे. त्याच्या गोदामासमोर आठ ते दहा मालवाहू वाहने थांबून होती. मात्र, पोलिसांची चाहुल लागताच काही वाहनचालकांनी तेथून पळ काढला. पण, चार वाहने पोलिसांना मिळून आली.
तक्रार देण्यास कुणीही येईना...
आर्वी पोलिसांनी तांदळाच्या वाहतुकीवर २५ रोजी सायंकाळच्या सुमारास कारवाई केली. त्यानंतर याबाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिली. तसे पत्रही आर्वी पोलिसांनी पुरवठा विभागाकडे पाठविले. पण, जिल्हा पुरवठा विभागाकडून तक्रार देण्यासाठी तसेच शहानिशा करण्यासाठी कोणीही आले नसल्याची माहिती आहे.