शासकीय तांदळाला फुटले पाय; मध्यप्रदेशात नेऊन विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 05:43 PM2022-02-17T17:43:02+5:302022-02-17T17:50:53+5:30
शासकीय धान्याचा काळाबाजार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही जण किराणा व्यावसायिकांना तसेच ऑटोचालकांना धान्य विक्री करीत असून संबंधित व्यावसायिक मध्यप्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकत असल्याची चर्चा आहे.
आष्टी (शहीद) : कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य व गरिबांना सरकारने मोफत अन्नधान्य देण्याचे जाहीर केले होते. मात्र, काही व्यापारी सर्वसामान्य व गरिबांकडून या शासकीय तांदळाची खरेदी करून मोठ्या वाहनांमध्ये पोते भरून तो तांदूळ मध्यप्रदेशात नेऊन विक्री सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे शासकीय धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आष्टी शहरासह तालुक्यात सरकारच्या माध्यमातून कोरोना काळापासून सर्वसामान्य व गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत आहे. मात्र, नागरिक ते धान्य स्वतःच्या उपयोगात आणत नसून सर्रासपणे स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री करीत आहेत. यात तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. तसेच तालुक्यातील काही भागात १ किलो साखरेच्या बदल्यात ३ किलो तांदूळ देत असल्याची माहिती आहे. शासकीय धान्याचा काळाबाजार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही जण किराणा व्यावसायिकांना तसेच ऑटोचालकांना धान्य विक्री करीत असून संबंधित व्यावसायिक मध्यप्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकत असल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणात अद्याप कुठल्याही व्यापाऱ्यांवर व दुकानदारावर कारवाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावर लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे.