अंध शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 09:46 PM2019-07-21T21:46:13+5:302019-07-21T21:47:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशातच अंध शेतकऱ्याचा बैल सर्पदंशामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशातच अंध शेतकऱ्याचा बैल सर्पदंशामुळे दगावला. आपल्याला शासकीय मदत मिळावी यासाठी त्या शेतकऱ्यांने शासनाच्या विविध कार्यालयात उंबरठे झिजविले. परंतु, शासकीय मदत न मिळाल्याने या दिव्यांग शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्याने अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन पाठविले आहे.
प्राप्त माहीतीनुसार, शेतकरी वसंतराव बगुलकर हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. त्याचेकडे तीन एकर शेती असून मुलगा नितीन याच्या आधाराने ते शेतजमीन करून आपला उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी या शेतकऱ्याला पाहिजे तसे उत्पन्न झाले नाही. अशातच हवालदील झालेल्या या शेतकºयाच्या मालकीचा एक बैल सर्पदंशाने दगावला.
बैलाचे शवविच्छेदन झाले. शिवाय पंचनामाही करण्यात आला. बैल दगावल्यामुळे शासकीय मदत मिळावी या उद्देशाने सदर कागदपत्रांसह इतर आवश्यक कागदपत्रे जोडून रितसर प्रस्ताव तहसीलदारांसह वनविभागाला देण्यात आला. परंतु, सदर अधिकाºयांनी नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाई यादीत सर्पदंशाचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे कारण पुढे करून या अंध शेतकऱ्याच्या अडचणीत भर टाकली आहे.
शिवाय त्याला अद्यापही शासकीय मदत मिळालेली नाही. आपल्याला न्याय मिळावा या हेतूने या शेतकºयाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनावरून आता काय कार्यवाही होते, याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.
सर्पदंशाने मृत्यू हे प्रकरण नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नसल्याने महसूल विभागामार्फत शासकीय मदत दिली जात नाही. महसूल विभाग केवळ पंचनामा करतो. त्याचा फायदा वनविभागाकडून शासकीय मदत मिळवून घेण्यासाठी शेतकऱ्याला होतो. पारडी येथील वसंतराव बगुलकर यांच्या मालकीच्या मृत बैलाचा पंचनामा महसूल विभागाने केला. पुढील बाब वनविभागाची आहे.
- सचिन कुमावत, तहसीलदार, कारंजा (घा.)