मंडपातच केले वधु-वराने रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:58 PM2018-05-07T23:58:09+5:302018-05-07T23:58:24+5:30
पारिवारिक उत्सवांचा आनंद खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी सामजिक बांधीलकीचे भान जपत जिव्हाळा परिवाराचे संस्थापक सदस्य सचिन घोडे व अध्यक्ष अतुल पाळेकर यांनी अनोखा उपक्रम राबविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पारिवारिक उत्सवांचा आनंद खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी सामजिक बांधीलकीचे भान जपत जिव्हाळा परिवाराचे संस्थापक सदस्य सचिन घोडे व अध्यक्ष अतुल पाळेकर यांनी अनोखा उपक्रम राबविला. अतुल पाळेकर यांनी बहीण अंजलीच्या लग्नानिमित्त ‘लग्नमंडपी रक्तदान सोहळा’ हा अनोखा उपक्रम राबविला. यात वधु-वरासह २० सेवानिष्ठांनी उतस्फूर्तपने रक्तदान केले.
रक्तदान सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जिव्हाळा परिवाराच्या महिला सदस्य सिंपल किशोर वागदरकर यांनीही रक्तदान करून महिलांमध्ये रक्तदानाबाबत कृतीतून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पराग ढोबळे यांनीही रक्तदान करून समाजाला अशा उपक्रमांची गरज असल्याचा संदेश दिला. जिव्हाळा सेवाभावी संस्था कुठलाच ब्लड डोनेशन कॅम्प न घेता रुग्णांच्या गरजेनुसार विविध रुग्णालयात मोफत रक्तदाते पुरवित असते. संस्थेच्या या पहिल्याच शिबिरामध्ये जिव्हाळा परिवाराचा मागील दीड वर्षाच्या काळातील ५०० व्या रक्तदात्यानेही रक्तदान केले. यावेळी सेवाग्राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे उत्तम सहकार्य लाभले. जिव्हाळा परिवाराची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. लग्नमंडपी रक्तदान सोहळा शहरातील एका सभागृहात पार पडला.
समाजातील अत्यंत गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत करणे तथा गरजुंना मोफत रक्तदाते उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश समोर ठेवून जिव्हाळा परिवार समाजातील वंचितांसाठी निरंतर कार्य करीत आहे. जिव्हाळा सेवाभावी संस्थेने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे लग्नात सहभागी पाहुणे मंडळींनीही कौतुक केले.
२० दात्यांचे रक्तदान
लग्नमंडपी रक्तदान सोहळा या अभिनव उपक्रमाचे लग्नासाठी आलेल्या पाहुणे मंडळींनी कौतुक करीत त्यातील २० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक दायित्वाचा परिचय करून दिला. लग्नसमारंभात रक्तदानाची संकल्पना प्रथमच राबविली गेल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. वर-वधुने रक्तदान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.