खडकाळ जमिनीवर फुलविले हिरवे स्वप्न
By admin | Published: January 24, 2016 01:57 AM2016-01-24T01:57:27+5:302016-01-24T01:57:27+5:30
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले.
चामला गावातील यशोगाथा : खडकांचे सात थर फोडून खोदल्या पाच विहिरी
अमोल सोटे आष्टी (श.)
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले. प्रामाणिकता, जिद्द, चिकाटी व परिश्रमाचा त्यांनी आगळाच आदर्श घालून दिला आहे.
रेड झोन व डोंगरमाथ्यावर वसलेले चामला गाव. येथे वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशा कठीण परिस्थितीत ७० वर्षीय शंकर मदनकर यांनी स्वत:च्या दहा एकर शेतीला दगडाच्या संघर्षातून फुलविण्याचा निर्धार केला. यासाठी श्रीकृष्ण, हरिष व सुरेश या तीन मुलांना सोबत घेऊन २००३ मध्ये शेतात पहिली विहिर खोदली. ८० फुट खोलवर दगड खोदून पाणी लागले. एका विहिरीच्या खोदकामाला ३ वर्षे लागलीत. दगडांचे थर लागले; पण ते हिंमत हरले नाही. ७२ फुटावर मऊ भाग लागला आणि पाणी मुबलक मिळाल्याने त्यांचे समाधान झाले.
यानंतर शासकीय योजनांच्या मागे न लागता कष्टाच्या पैशातून संत्र्याची ३०० झाडे लावली. दगड व मुरूम यात कसे खड्डे खोदायचे याचा सतत विचार; पण यावरही मात केली आणि प्रयत्नांना यश आले. संत्रा बगिच्याची देखभाल व्यवस्थित केल्याने २०११ पासून दरवर्षी २ ते ३ लाख रुपयांत बगिचाची विक्री होते. सोबतच कपाशी, तूर, सोयाबीन, मिरची भाजीपाला आदी पिके त्यांनी घेतली. यात नफा मिळाला; पण सिंचनासाठी पाणी कमी पडत होते. यामुळे २००७ मध्ये त्यांनी दुसरी विहिर खोदली. २०११ मध्ये आणखी दोन विहिरी खोदल्या. पैकी दोनच विहिरींना पाणी लागले. अखेरचा उपाय म्हणून आणखी एक विहीर खोदण्यास गतवर्षी सुरूवात केली. सध्या ५५ फुट खोदकाम झाले. आता मऊ भाग व पाणी लागले. या पाण्यातून नवीन संत्राची ३०० झाडे तयार करीत आहे.
वनविभागाचा सर्व्हे शेताला लागून आहे. मोजणी झाली तेव्हा वनकर्मचारी शंकरच्या शेतात आले. तीन एकर शेती वनविभागाच्या हद्दीत आहे, असा दम दिला. याला न घाबरता त्यांनी न्यायालयात धाव घेतली. माझा हक्क न्यायालय मिळवून देईल, यावर विश्वास असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
एका तपापासून सुरू आहे संघर्ष
गावापासून अर्धा किमी अंतरावर शेती आहे. वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने दररोज कुटुंबातील एका सदस्याला शेतात रक्षणासाठी जावे लागते. ऊन्ह, वारा, पाऊसासोबत १२ वर्षांचा संघर्ष आजही जिद्दीने सुरू आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही शेती प्रेरणा व नवीन दिशा देणारी ठरत आहे. कृषी विभागाचे आणखी तांत्रिक मार्गदर्शन लाभल्यास शेतीचे नंदनवन होऊ शकेल.
शेतकऱ्यांना शासन विविध योजनांचा लाभ देतात. चामला येथील शेतकरी शंकर मदनकर यांच्या शेताला भेट देऊन ईस्त्राईल पद्धतीच्या संत्रा लागवडीस प्रोत्साहित करणार आहे.
- अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.
खडकाळ भागात विहिरीचे खोदकाम करताना त्रास झाला; प्रामाणिक कष्टाने फळ मिळाले. मी व माझी तीनही मुले दिवसभर शेतीला वेळ देतो. यामुळे आर्थिक बाजू भक्कम झाली.
- शंकर मदनकर, शेतकरी, चामला.