योजनांची भरमार, माहितीचा अनुशेष मात्र कायम
By admin | Published: July 18, 2015 01:59 AM2015-07-18T01:59:51+5:302015-07-18T01:59:51+5:30
ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असे म्हणत श्रमिकांचा आवाज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मजबूत केला.
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन विशेष : दुर्बल घटकांच्या उत्थानाच्या बऱ्याच योजना बंद
पराग मगर वर्धा
ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असे म्हणत श्रमिकांचा आवाज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मजबूत केला. त्यामुळे या समाजाला समाजभान आले. मातंग समाजात अंतर्भूत असलेल्या १२ पोटजातीच्या विकासासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबईची स्थापना करून अनेक योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात २०११ ते १५ या चार वर्षात जवळपास १६७ समाजबांधवांना विविध योजनांना लाभ मिळाला आहे.
मातंग समाजातील दुर्बल घटकांतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक विकास व्हावा यासाठी राज्यशासनामार्फत ११ जुलै १९८७ पासून या महामंडळाची स्थापना केली. महामंडळामार्फत बीज भांडवल योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना, शिष्यवृती योजना राबविल्या जातात. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ मर्यादित दिल्ली (एनएसएफडीसी) मार्फतही मुदत कर्ज योजना, लघुॠण वित्त योजना, महिला समृद्धी योजना, महिला विकास योजना शैक्षणिक कर्ज योजना आदी योजना राबविल्या जातात. असे असतानाही जागृतीचा अभाव लाभार्थ्यांच्या संख्येवरून पहावयास मिळतो. लवकर लाभ मिळत नसल्याच्याही तक्रारी पुढे आल्या आहेत. तसेच अनेक योजनांमध्ये अर्ज करूनही लाभ मिळाला नसल्याचेही लाभार्थी सांगत असतात. त्यामुळे महामंडळाला आणखी बळकटीची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
आणखी बळकटी देण्याची गरज
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.), मुंबई आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ मर्यादित दिल्ली (एनएसएफडीसी) मार्फत अनेक योजना अण्णाभाऊसाठे यांच्या नावे राबविल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागात महामंंडळाचा स्वतंत्र विभाग असतो; परंतु योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत उदासीनता आणि शासनामार्फत पैसे मिळण्यासाठी लागत असलेला अवधी यामुळे योजनांच्या लाभार्थ्यांचा आकडा पाहिजे त्या प्रमाणात वाढलेला दिसत नाही.