बोंडअळीचा पलटवार; शेतकरी हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 08:34 PM2018-11-10T20:34:08+5:302018-11-10T20:34:42+5:30
निसर्गाचा लहरीपणा आणि बोंंडअळीेचं आक्रमण शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. मागील वर्षी कापूस उत्पादकांच्या नाकीनव आणणाऱ्या बोंडअळीने यावर्षी सुरुवातीलाच आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच झाल्याने शेतकरी हादरला आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : निसर्गाचा लहरीपणा आणि बोंंडअळीेचं आक्रमण शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. मागील वर्षी कापूस उत्पादकांच्या नाकीनव आणणाऱ्या बोंडअळीने यावर्षी सुरुवातीलाच आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच झाल्याने शेतकरी हादरला आहेत.
यावर्षी बोंडअळीचे आक्रमण होताच कृषी विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे व पिकही लहान असल्याने त्यावर नियंत्रण ठेवता आले. परंतु आता कपाशीतून चालणेही कठीण झाले आहे. दत्तपूर शिवारात जीवन पाहुणे व मोरेश्वर हुलके यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात बोंडअळी आढळून आली. पाहुणे यांच्या शेतातील २५ टक्के बोंडांना सध्या किड लागल्याने ती किड शेतात इतरत्र पसरू नये म्हणून त्यांनी किडग्रस्त बोंड तोडून घरी वाळवायला सुरुवात केली आहे. मागील वर्षीही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच बोंडअळींचा उद्रेक दिसून आला होता. परिणामी शेतकºयांना एकरी २ ते ३ क्विंटल कापसावरच समाधान मानावे लागले. कमी पर्जन्यमानामुळे कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असून राहिलेली बोंड फुटू लागली आहे. परंतु त्या बोंडातील सरकी किडीने पोखरल्याने कापूस वजनाला हलका भरत आहे. तसेच दर्जाची खालावलेला आहे. त्यामुळे याहीवर्षी कापुस उत्पादकांना बोंडअळीमुळे चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
कृषी विभाग सुस्तच
बोंडअळी नियंत्रणात असल्याचा कृषी विभागाचा समज असल्यामुळे कृषी विभागही सुस्त दिसत आहे. कृषी सहायकांनी निरीक्षकाणासाठी निवडलेल्या शेतामध्ये बोंडअळी आढळली. परंतु ती ओळखणे कठीण आहे. त्यामुळे वर-वर पाहिले असता अळी दिसत नाही. त्यासाठी ते फोडून पाहणे गरजेचे आहे. सुरूवातीला लावलेले कामगंध सापळेही दिसेनासे झाले आहे. रात्रीची वीज नसल्यामुळे लाईट ट्रॅपचाही वापर होत नाही. फवारणी करणे शक्य नाही. या सर्व अडचणींतून बोंड अळीवर नियंत्रण कसे मिळविता येईल, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
बोंडअळीचे अनुदान नाही
मागील वर्षी आलेल्या बोंडअळीचे शासनाने जाहीर केलेले पहिल्या टप्प्याचे हेक्टरी ६ हजार ८०० रूपयाचे अनुदान आजपर्यंत मिळाले नाही. रक्कम आल्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात येते. बियाणे कंपनी व विमाकंपनी कडून येणारी उर्वरीत रक्कम कधी जमा होईल. हे सांगण कठीण आहे.
रासायनिक खत व पाण्याच्या अतिवापर ज्या शेतकऱ्यांनी केला त्याच्या शेतात बोंडअळी आढळून येत आहे. कृषी विभागाला शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सुरूवातीला बोंडअळीवर नियंत्रण ठेवता आले. आताही शेतकऱ्यांनी कामगंध सापळे लाईट ट्रॅप, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काचा वापर केल्यास गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण ठेवता येते. कपाशीला पाणी देऊ नये. त्यामुळे परिपक्व बोंडे लवकर फुटतील व चांगल्या प्रतिचा कापूस घेता येईल.
प्रशांत भोयर, कृषी सहाय्यक, पवनार
नैसर्गिक आपत्तीचे अनुदान नाही
मागच्या वर्षी वादळ व मुसळधार पावसामुळे पवनार शिवारात मोठ्या प्रमाणात कपाशीचे नुकसान झाले होते. त्याचा सर्व्हे झाल्यानंतर शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्याचे अनुदानही महसूल विभागाला प्राप्त झालेले आहे. परंतु हे अनुदान कृषी विभागाने वाटायचे की महसूल विभागाने, हे कोडे न सुटल्यामुळे ते अनुदान पडूप आहे. कृषी विभागामार्फत महसूल विभागाला लाभार्थ्यांच्या याद्या दिल्या आहे. परंतु त्या यादीमध्ये लाभार्थ्यांचे खाते क्रमांक नाही. तलाठ्याने बोंडअळीचे अनुदान जमा करताना खाते क्रमांक दिलेले असतानाही खाते क्रमांक नसलेल्या याद्या देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.