बोगस बीटी बियाणे जप्त
By admin | Published: June 26, 2016 01:56 AM2016-06-26T01:56:33+5:302016-06-26T01:56:33+5:30
कारंजा तालुक्यातील उमरी येथील चंद्रशेखर हरिभजन फरकाडे नामक व्यक्ती कपाशीची बोगस बीटी बियाणे विकत असल्याची माहिती....
पोलिसात तक्रार : कृषी विभागाच्या जिल्हा पथकाची कार्यवाही
वर्धा : कारंजा तालुक्यातील उमरी येथील चंद्रशेखर हरिभजन फरकाडे नामक व्यक्ती कपाशीची बोगस बीटी बियाणे विकत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हा पथकाला मिळाली. कृषी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी रात्री धाड घातली असता सदर इसमाच्या घरी कुठलीही नोंद नसलेली बीटी बियाणे आढळून आले. या संदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
कृषी विभागाच्या पथकाने जप्त केलेल्या बियाण्यांच्या पाकिटावर कुठलीही परवानगी असल्याची नोंद नव्हती. शिवाय बियाण्यांवर आवश्यक असलेला लॉट क्रमांक, किंमत अशी कुठल्याही नोंदी नसल्याचे आढळून आले. शिवाय या संदर्भातील कुठलीही माहिती फरताडे याच्याकडे उपलब्ध नव्हती. यावरून सदर बियाणे बोगस असल्याचे लक्षात आल्याने घरात आढळलेली तीन पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केली. याची तक्रार कारंजा पोलिसात केली असून चंद्रशेखर फरकाडे याच्या विरोधात बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस अधिनियम २००९ व जीवनावश्यक वस्ते कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाले दिली.
जिल्ह्यात मान्सूनचे आगमण झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पेरणीकरिता आवश्यक बियाण्यांकरिता त्यांची मान्यताप्राप्त कृषी केंद्रात गर्दी होत आहे. बियाण्यांकरिता होत असलेल्या गर्दीचा लाभ उचलत उमरी येथील फरकाडे याच्याकडून बोगस बियाणे विकण्याचा सपाटा सुरू असल्याची माहिती मिळताच जि. प. प्रभारी कृषी अधिकारी संजय बमनोटे, आर. धर्माधिकारी, कृषी विस्तार अधिकारी देवकर, गुण नियंत्रक दबरासे यांनी धाड घालून ही त्याचे बिंग फोडले. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.(प्रतिनिधी)
घरी आढळली फक्त तीन पाकिटे
फरकाडे याच्या घरावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली असता त्यांना आदेश ११ या नावाच्या बीटी बियाण्याची तीन पाकिटे मिळून आली. त्याने परिसरात या नावाची बरीच बियाणे विकल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यास त्याने विकलेले बियाणे जप्त करणे सोईचे जाईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.