बोंडअळीचे अनुदान मिळाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:51 PM2018-08-23T21:51:43+5:302018-08-23T21:52:28+5:30
मागील खरीप हंगामात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले, पण खरीप हंगाम पार पडण्यावर असतानाही घोराडच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : मागील खरीप हंगामात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले, पण खरीप हंगाम पार पडण्यावर असतानाही घोराडच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली.
या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात विचारणा केल्यावर मी याद्या तहसील कार्यालयात पाठविल्या, निधी आल्यानंतर जमा होईल, अशी उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार महेंद्र सोनोने यांना निवेदन देवून त्याचे लक्ष वेधले. इतर भागातील शेतकऱ्यांना गत काही महिण्या अगोदरच अनुदानाची रक्कम मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. घोराडच्या तलाठ्यांनी याद्याच तर उशिरा पाठविल्या नसाव्या अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. येथील तलाठी प्रभारी असून यांच्याकडे जुनगड सांझाचा मुख्य भार आहे.
घोराडला नविन पूर्ण वेळ तलाठी द्यावा अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. बोंडअळीचे अनुदान त्वरित देण्यात यावे असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी विठ्ठल झाडे, गणेश खोपडे, आशिष राऊत, गणेश सुरकार आदीसह घोराडचे शेतकरी हजर होते.
बॅक खाते क्रमांकाची नोंद नाही
बोंडअळीच्या अनुदानाच्या याद्या तहसील कार्यालयात पाठविल्या असल्या तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या बॅँक खात्याचा क्रंमाकांची त्यात नोंद नसल्याची माहिती आहे. तशा शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयातून बॅँक खाते क्र. मागविण्यात आला नसल्याने हे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्यांनी व्यवस्थित बॅक खाते क्रमांक दिले त्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली अशी माहिती पुढे आली आहे.