बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ घालतेय पर्यटकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 02:46 PM2022-02-08T14:46:31+5:302022-02-08T14:53:54+5:30
बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ अशी ओळख असलेल्या ‘कॅटरिना’ नामक वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे.
वर्धा : देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख असली तरी या प्रकल्पात सुमारे दहाहून अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य आहे. त्यामुळे येथे नेहमीच जंगल सफारीसाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील पर्यटक येतात.
तर सध्या याच ‘प्रकल्पाची राणी’ अशी ओळख असलेल्या ‘कॅटरिना’ नामक वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे. नुकतेच बीटीआर-३ (कॅटरिना) या वाघिणीचे दर्शन पर्यटकांना मानोली शिवारात झाले आहे. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील कॅटरिना सध्या येथे जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना चांगलीच भुरळ घालत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कोविड संदर्भातील नियमांचे करावे लागते पालन
जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात जिल्हा प्रशासन व राज्य तसेच केंद्र शासनाच्या वतीने कोविड संदर्भातील देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेच लागते. खबरदारीचा उपाय म्हणून येथे विना मास्क पर्यटकांना प्रवेशच दिला जात नाही.
‘या’ वन्यजीवांचे होते दर्शन
बोर व्याघ्र प्रकल्पात दहाहून अधिक प्रौढ वाघ, सुमारे १५ बिबट, एक हजाराहून अधिक हरीण, सुमारे १५ अस्वल, २८ हून अधिक रानकुत्रे, एक रानगव्हा, सांबर, नीलगाय, मोर आदी वन्यजीवांचे वास्तव्य आहे. वन्यजीवांसाठी नंदनवन असलेल्या या देशातील सर्वांत छोट्या व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करताना विविध वन्यजीवांचे दर्शन पर्यटकांना होते. तर सध्या कॅटरिना नामक वाघिणीचे दर्शन पर्यटकांना होत आहे.
१३८.१२ चौ.कि.मी. क्षेत्रफळ
बोर व्याघ्र प्रकल्प हे एक वन्यजीव अभयारण्य आहे. जे जुलै २०१४ मध्ये ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आले. हे वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असून, येथे नागपूर तसेच वर्धा मार्गे जाता येते. हे विविध वन्य प्राण्यांसाठी नंदनवन असून, त्याचे राखीव क्षेत्र १३८.१२ चौरस किमी क्षेत्र व्यापते. विशेष म्हणजे याच प्रकल्पात बोर हा जलाशय आहे.