बोरच्या 'युवराज'ने पाहुणपणासाठी गाठले ‘कोअर’; वाढत्या थंडीमुळे वाघांची ‘सेफ झोन’कडे धाव?
By महेश सायखेडे | Published: December 12, 2022 10:07 PM2022-12-12T22:07:15+5:302022-12-12T22:08:08+5:30
देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प अशी बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे.
महेश सायखेडे, वर्धा : देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प अशी बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. त्यातच बोरचे कोअर क्षेत्र वाघांसाठी अतिशय सुरक्षित परिसर समजले जाते. या व्याघ्र प्रकल्पात सुमारे दहाहून अधिक वाघांचे वास्तव्य आहे. याच प्रौढ वाघांमध्ये बीटीआर-८ या युवराज नामक रुबाबदार वाघाचा समावेश आहे. एरवी तो बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मुक्त संचार करतो; पण सध्या थंडीच्या दिवसांत युवराज नामक रुबाबदार वाघाचे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये दर्शन होत आहे. रविवारी जंगल सफारीसाठी बोर व्याघ्र प्रकल्पात आलेल्या काही पर्यटकांना बीटीआर-८ 'युवराज'ने दर्शन दिले. त्यामुळे या पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
कोण आहे युवराज?
बीटीआर-८ युवराज नामक वाघ हा बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी बीटीआर-३ कॅटरिना नामक वाघिणीचा मुलगा आहे. तर बीटीआर-७ पिंकी नामक वाघीण ही युवराजची बहीण आहे. पिंकी नामक वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या पिंकीच्या भावाचे बोर व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये पर्यटकांना दर्शन होत आहे.
एरवी राहतो कारंजाच्या जंगलात संचार
सध्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये दर्शन होत असलेल्या बीटीआर-८ या युवराज नामक वाघाचा एरवी कारंजा तालुक्यातील जंगल परिसरात मुक्त संचार राहतो. तो बहुदा बोरच्या कोअर झोनमध्ये येत असला तरी ऐन थंडीच्या दिवसांत त्याने आपला डेरा सेफ झोन असलेल्या बोरच्या कोअर क्षेत्रात टाकल्याने पर्यटकांनाही त्याचे दर्शन होत आहे.
बोरबनात ‘सायटिंग’
पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी शनिवारी व रविवारी जंगल सफारीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी राहते. रविवार, दि. ११ रोजी बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी आलेल्या काही पर्यटकांना सफारी सुरू केल्यावर अवघ्या ३ किमी अंतरावर बोरबन भागात युवराजची सायटिंग झाली.
डरकाळी फोडत ओलांडला जिप्सीचा रस्ता
रविवारी काही पर्यटकांना बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये युवराज नामक वाघाने दर्शन दिले. युवराज या रुबाबदार वाघाने डरकाळी फोडतच जिप्सीचा रस्ता ओलांडला. ज्या पर्यटकांना व्याघ्रदर्शन झाले त्यांनी आज खऱ्या अर्थाने आपल्या जंगल सफारीचे फलित झाल्याचे बोलून दाखविले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"