बोरखेडी व सुसूंदात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:01 AM2018-03-31T00:01:47+5:302018-03-31T00:01:47+5:30
न्यु बोर अभयारण्याला लागून असलेल्या गावात वाघाने दहशत निर्माण केली आहे. वाघाच्या या दहशतीमुळे सुसूंदचे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे.
ऑनलाईन लोकमत
आकोली : न्यु बोर अभयारण्याला लागून असलेल्या गावात वाघाने दहशत निर्माण केली आहे. वाघाच्या या दहशतीमुळे सुसूंदचे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे दिवसाही शेतकरी शेतात जाण्याकरिता घाबरत असल्याचे वास्तव आहे. या वाघाने बोरखेडी व सुसूंद येथील दोन शेळ्या दोन वेगवेगळ्या घटनेत फस्त केल्याने नागरिक आणखीच धास्तावले आहे.
खरांगणा वनपरिक्षेत्राच्या बोरखेडी येथे सायंकाळी शेळ्यांचा कळप घराकडे येत असतांना गावाजवळ असलेल्या बेशरमच्या झुडपात लपून असलेल्या वाघाने हल्ला केला. कळपातून रंगदेव मरस्कोल्हे यांच्या मालकीची शेळी उचलून नेत फस्त केली. सुसूंद येथे सातत्याने पाळीव प्राण्यावर हल्ले होत असल्याने व शेत शिवारात वाघाचा वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर भयभीत आहे. चंपा शिवारात शेळ्यांचा कळप चरत असताना लेंडे यांच्या शेताजवळ कळपावर वाघाने हल्ला केला. यात गौतम सोनटक्के यांची शेळी फरफटत नेली. यापूर्वी चार शेळ्या वाघाच्या भक्षस्थानी पडल्या असून दोन गोºहे मरणाच्या दारात उभी आहेत.
सुसूंद, सहेली येथील शेतकऱ्यांची कामे प्रभावित झाल्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. ताल्हण यांना निवेदनातून केली. सुसूंद परिसरात उन्हाळी मशागतीची कामे प्रभावित झाली आहेत. शेतमजूर कामाला जायला घाबरतात असे पोलीस पाटील वसंत सपकाळ यांनी सांगितले.