‘बोर’ अन् ‘धाम’ देणार रबी हंगामात शेतकऱ्यांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 06:00 AM2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:14+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत वर्षी अल्प पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या दिवसातच उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले होत. त्यावेळी सिंचनासाठी नाममात्र पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु, यंदा पावसाच्या दिवसात जलाशयांमधील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून रबी पिकांना वेळीच पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने या दोन्ही जलाशयांमधून पाटबंधारे विभाग मुबलक पाणी सोडणार आहे. तसे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. बोर नदीचे पात्र कोरडे झाल्याने तसेच सेलूतील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याने सेलू नगरपंचायतीच्या मागणीला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाने बोर प्रकारातील १ दलघमी पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सोडले होते. तर वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमध्ये भीषण जलसंकट तयार झाल्याने धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचलही करण्यात आली होती. एकूणच उपलब्ध जलसाठा पाऊस सुरू होईपर्यंत कसा पुरविता येईल यासाठी नियोजन करताना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्यात बºयापैकी कपात त्यावेळी करण्यात आली होती. पण, सध्या बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरल्याने यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी शेतकऱ्याना मिळणार आहे. तसे नियोजनही वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शिवाय तसा प्रस्ताव अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. असे असले तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे.
बोरचा १०,५०० हेक्टर तर धामचा ३,९८५ हेक्टरला होणार लाभ
रबी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना सिंचनासाठी वेळीच पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. रबी हंगामातील पिकांना सिंचनासाठी बोर प्रकल्पातून ७० दलघमी तर धाम प्रकल्पातून ३१.८८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा ३ हजार ९८५ हेक्टरवरील पिकांना तर बोर मधून सोडण्यात येणाºया पाण्याचा १० हजार ५०० हेक्टरवरील पिकांना लाभ मिळणार आहे.
धाम मधील १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीव
उन्हाळ्याच्या दिवसात धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करून वर्धा शहरासह १३ गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यात आली होती. तर यंदा पावसाळ्यात हा जलाशय १०० टक्के भरल्याने उपयुक्त जलसाठ्यापैकी १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे औद्योगीक वापरासाठी या प्रकल्पातून ३.१३ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.