बोर कालव्याच्या वितरिका ५२ वर्षे जुन्या

By admin | Published: April 9, 2017 12:20 AM2017-04-09T00:20:15+5:302017-04-09T00:20:15+5:30

तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात ५२ वर्षांपूर्वी बोरधरणच्या माध्यमातून हातभार लागला.

Bore canal distributor is 52 years old | बोर कालव्याच्या वितरिका ५२ वर्षे जुन्या

बोर कालव्याच्या वितरिका ५२ वर्षे जुन्या

Next

सिंचन प्रभावित : उन्ह्याळ्यातच दुरुस्ती आवश्यक
विजय माहुरे   सेलू
तालुक्यात हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यात ५२ वर्षांपूर्वी बोरधरणच्या माध्यमातून हातभार लागला. या धरणाचा उद्देश कालव्यांच्या बिकट परिस्थितीमुळे अर्धवट राहत असून ५२ वर्षे जुन्या वितरिका, सायपण व पानचऱ्याचे नुतनीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे; पण दुरूस्तीची कामे उन्हाळ्याच्या दिवसांतच करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बोरधरण ते केळझरच्या पूढे जाणारा कालवा हा २० किमीहून अधिक लांबीचा असून एकूण १४ मायनरच्या माध्यमातून २१७ किमी लांबीची वितरिका आहे. या वितरिकांतून ओलीताकरिता शेतात सुरळीत पाणी पोहोचावे यासाठी अनेक पानचऱ्या आहेत; पण ५२ वर्षांत पाटबंधारे विभागाच्यावतीने या वितरिकांची थातूरमातूर दुरुस्ती करून रबी हंगामाला पाणी पुरविण्यात आले आहे.
आज या वितरिकांची स्थिती बिकट झाली आहे. यामुळे धरणातून कालव्याला सोडलेल्या पाण्यापैकी ४० टक्के पाणी वाया जात आहे. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून उपाययोजना होत नाही. नादुरुस्त सायपण व गेटमुळे शेतात पाणी घेतना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून खोलवर खड्ड्यात आडवा बांध लावण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे.
ठिकठिकाणी कालवे फुटले आहेत. कालव्यात अनेक झाडे झुडपे वाढली आहेत. कालव्याची खोली कमी झाली आहे. या सर्व स्थितीमुळे हरित क्रांतीचे स्वप्न धुसरच झाले आहे. केंद्र ते गाव हा उद्देश ठेवून विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी कोट्यवधीचा निधी आणल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे; पण ५२ वर्षांच्या काळात या प्रकल्पाला नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
ओलीतासाठी शेतापर्यंत सुरळीत पाणी पोहोचण्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. काही वर्षांपूर्वी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती; पण ती नावापुरती ठरली. रबी हंगामात वितरिकेवर उपस्थित राहणारे कर्मचारी चार ते पाच वर्षांपासूप बेपत्ता झाल्याचे दिसते. परिणामी, काम रामभरोसे सुरू आहे. कर्मचारी नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असून शेताच्या बांधापर्यंत जाणारे पांदण रस्ते जलमय होतात. यामुळे रबी हंगामात शेतकऱ्यांना वहिवाट करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

२० किमी लांब कालवाही कुचकामी
बोरधरण प्रकल्पासून केळझरच्या पूढे जाणारा कालवा २० किमीहून अधिक लांबीचा आहे. यात एकूण १४ मायनरच्या माध्यमातून २१७ किमी लांबीची वितरिका आहे. या वितरिकांतून ओलितासाठी शेतात सुरळीत पाणी पोहोचावे यासाठी अनेक पानचऱ्या आहेत; पण पाटबंधारे विभागाद्वारे या वितरिकांची कायम दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी, २० किमीपेक्षा अधिक लांबीचा कालवा व २१७ किमी वितरिकाही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.

 

Web Title: Bore canal distributor is 52 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.