बोर-धाम नदीपात्र कोरडे; भरपावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:02 IST2019-07-23T22:02:04+5:302019-07-23T22:02:40+5:30
दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

बोर-धाम नदीपात्र कोरडे; भरपावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
नदीने सुबत्ता आणि समृद्धी दिल्याने नदीकाठावरची गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहे. मात्र, यावेळी पर्जन्यमानाचा चांगलाच फटका बसला. जुलै महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असला तरी दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने देर्डा आणि सावंगी या दोन गावांमधून आणि संगम असलेल्या बोर व धाम नदीपात्रात ठणठणाट असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नदीकाठावरील शेतात सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. पिकांना पावसाची गरज आहे; मात्र वरूणराजा रूसल्याने आणि नदी कोरडी असल्याने सिंचन कसे करायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
अंतसंस्काराचे सोपस्कार नदीवर केले जातात; पण नदी कोरडी आहे. त्यामुळे डोहच आधार आहे, पण त्यावरही शेवाळ तयार झाले आहे. मात्र विधीचे काम असल्याने पाणी कसेही का असेना सोपस्कार उपलब्ध पाण्यात उरकविण्यात येत आहे. डोहालाही कोरड पडली होती; पण उन्हाळ्यात देर्डा येथील विहिरीचे खोलीकरण आणि बांधकाम करण्यात आले. त्यावेळी विहिरीचे पाणी डोहात सोडण्यात आल्याने डोहात पाणी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रानात चारा नाही, पाणी नाही. त्यामुळे घरीच गोपालक आणि मालकांना जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. भर पावसाळ्यात उन्हाच्या तडाख्यामुळे पाणीपातळी वेगाने खाली जात आहे. शेतात वाळण येत असून जनावरेदेखील सावलीचा शोध घेत असल्याचे दिसून येत आहे. अल्पशा पावसामुळे नदी, नाले अद्याप कोरडे आहेत. यामुळे शेतकरी व नागरिकांच्या घशाला कोरड पडणार, यात शंका नाही.
जुलै महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असून आता नागरिकांची भिस्त केवळ आॅगस्ट महिन्यावर आहे. सर्वांनाच धो-धो पावसाची प्रतीक्षा असून नागरिक आकाशाकडे टक लावून पाहत एकदा तरी मनसोक्त कोसळ, अशी आळवणी परमेश्वराला नागरिकांकडून करण्यात येत आहे.