महामार्गामुळे बोर नदीपात्र होणार समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 09:43 PM2019-04-12T21:43:31+5:302019-04-12T21:44:57+5:30
जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या नदीचे रूपडे पालटण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यांतून महाराष्ट्र समृद्धी महामार्ग गेल्याने ७७३ शेतकरी गडगंज झाले आहेत. यापैकी ७३५ शेतकऱ्यांना ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा मोबदला मिळाला आहे. याकरिता या तिन्ही तालुक्यांतून ४९८.८१ हेक्टर शेती संपादित करण्यात आली आहे. या परिसरातील शेतींना चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे दिवस पालटले आहे. शेतकºयांनी शेतीचा पैसा शेतीतच गुंतवल्याचे दिसून येत आहे. आता सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाकरिता महत्त्वाची ठरणाºया तसेच १६ हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या बोरनदीचाही कायापालट करणे आवश्यक आहे. या नदीपात्राची अद्याप स्वच्छता झाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि जलपर्णींनी वेढा घातला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी या नदीपात्रातील गाळ वापरण्यात यावा, जेणेकरून नदीचेही पात्र खोल आणि स्वच्छ होईल, या उद्देशाने स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हाधिकाºयांना पत्र दिल्यानंतर त्यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व पाटबंधारे विभागाकडे अहवाल मागितला होता. या दोन्ही विभागाने गाळ काढण्याकरिता सहमती दर्शविली असून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.