बोर व्याघ्र प्रकल्पात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:00 PM2019-01-22T22:00:04+5:302019-01-22T22:01:10+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पसह प्रादेशिक वनविभागाच्या जंगलाला अचानक आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी सागवानाची डेरेदार झाडे पडली. शिवाय, काही वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : बोर व्याघ्र प्रकल्पसह प्रादेशिक वनविभागाच्या जंगलाला अचानक आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी सागवानाची डेरेदार झाडे पडली. शिवाय, काही वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सुमारे २० हेक्टर जंगल परिसरात लागलेल्या या आगेवर नियंत्रण मिळविण्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले असले तरी या आगीमुळे कोटींच्या वनसंपदेचे नुकसान झाल्याचे सांगितल्या जात आहे. ही आग लागली, की कुणी लावली याबाबत कुठलाही ठोस पुरावा अद्याप वनविभागाच्या हाती लागलेला नाही. शिवाय परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या मरकसूर, बोरगाव (गोंडी) व माळेगाव ठेका भागातील जंगल परिसराला अवघ्या काही तासांच्या कालावधीत आगीने आपल्या कवेत घेतले होते. आग लागल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी शर्र्थीचे प्रयत्न करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. परंतु, आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत सुमारे १५ ते २० हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाल्याचे वास्तव आहे. बोर व्याघ्र प्रकल्प आणि त्याला लागून असलेल्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवानाची वृक्ष आहेत. इतकेच नव्हे, तर वर्धा जिल्ह्याच्या या परिसराला सागवानाची खोरीच म्हणून ओळखल्या जाते. शिवाय या जंगल परिसरात अनेक औषधी वनस्पतीही आहेत. या भागातील जंगल परिसरात वाघ, अस्वल, बिबट या हिंसक वन्यप्राण्यांसह अनेकांना भुरळ घालणारे हरिण, रोही, निलगाय, ससे आदी वन्यप्राणीही आहेत. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे काही वन्यप्राणी भाजले असावे किंवा काहींचा आगीत होरपळून मृत्यू झाला असावा असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कुठल्याही अग्निशमन दलाच्या जवानांची मदत न घेता ब्लोअरच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी सुमारे ५० हेक्टर जंगल परिसराला आगीने आपल्या कवेत घेतले होते, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात
या घटनेत सागाची डेरेदार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात शासनाचे कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. शिवाय काही वन्यप्राणीही भाजून जखमी झाल्याचे तसेच काही वन्यप्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला असावा, असाही कयास बांधला जात आहे. एका युवकास बोर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्लोअर ठरले उपयुक्त
जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे वनविभागासह बोर व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सदर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्लोअर मशीनचा वापर करण्यात आला. तसेच पारंपरिक पद्धतीचाही अवलंबही याप्रसंगी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
आग लावली, की लागली?
ज्या जंगल परिसरात आग लागली. त्या भागात तेंदूचे झाड आहेत. शिवाय या भागात अवैध वृक्षतोड व चराईचा प्रकार होत असल्याचे अनेक कारवाईत पुढे आले असल्याने ही आग लागली, की कुणी आपल्या अवैध व्यवसायांवर पांघरून घालण्यासाठी तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी लावली याबाबत सध्या परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, या भागातील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याचे बोलले जाते.
शर्थीच्या प्रयत्नांना यश
आग लागल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांनी आपल्या हालचालींना वेग देत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे घेऊन घटनास्थळ गाठले. वनविभागाच्या सुमारे ४० अधिकारी व कर्मचाºयांनी तसेच वनमजुरांनी शर्र्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या २७ हेक्टर जंगल परिसरात आग लागली होती. आम्ही शर्थीचे प्रयत्न करून ब्लोअर यंत्राच्या सहाय्याने त्यावर नियंत्रण मिळविले. या कार्यात आम्हाला ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.
- ए.एस. तिजारे, क्षेत्र सहाय्यक, बोर व्याघ्र प्रकल्प, बोरधरण