जंगल सफारीतून बोर व्याघ्र प्रकल्पाची कमाई ३३.८० लाख
By Admin | Published: March 19, 2017 12:45 AM2017-03-19T00:45:29+5:302017-03-19T00:45:29+5:30
जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळ घालत आहे.
सहा वर्षांत ५० हजार पर्यटकांची नोंद
रितेश वालदे सेलू
जिल्ह्याच्या वन वैभवात भर घालत असलेला बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना भूरळ घालत आहे. या व्याघ्र प्रकल्पाला गत सहा वर्षांत तब्बल ५० हजार १३० पर्यटकांनी भेट दिली आहे. या पर्यटनातून वनविभागाला एकूण ३३ लाख ८० हजार १९५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. शिवाय वन विभागातर्फे पर्यटकांसाठी आॅनलाईन सुविधाही उपलब्ध असल्याने या वर्षभरात १,२३० पर्यटकांनी आॅनलाईन बुकींग केल्याचे समोर आले आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पात दोन ठिकाणाहून जंगल सफारीसाठी सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील अडेगाव गेट तर वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथून जंगल सफारीचा आनंद घेता येतो. या दोन्ही ठिकाणावरून आॅनलाई बुकींग सुविधा उपलब्ध आहेत.
बोर व्याघ्र प्रकल्प १५ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौ.कि़मी.) मध्ये पसरला आहे. यात बोर व न्यू बोर असे दोन भाग असून वर्धा-नागपूर जिल्ह्यात त्याची सिमा आहे. या दोन भागात जंगल सफारीसाठी ४७ कि़मी. क्षेत्र (जागा) उपलब्ध करून दिले आहे.
पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमी
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमी आहे. जैविक विविधतेने नटलेल्या या प्रकल्पामध्ये दररोज दोन अस्वल, वाघ बाजीराव, अंबिका, कॅटरीना व तिच्या दोन पिल्लांचे पर्यटकांना दर्शन होत आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची गर्दी कायम
बोर व्याघ्र प्रकल्पात प्राण्यांना पिण्यासाठी नैसर्गिक पाणवठ्यांसह कुत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले आहे. या पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची सतत वर्दळ असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना त्यांचे दर्शन सहज होते.