कायमस्वरूपी पट्ट्यांकरिता बोरगाववासीयांचा एल्गार

By admin | Published: May 2, 2017 12:11 AM2017-05-02T00:11:19+5:302017-05-02T00:11:19+5:30

बोरगाव (मेघे) परिसरातील वॉर्ड क्रमांक १ व ५ मधील रहिवाशांनी कायमस्वरूपी पट्ट्यांची अनेक वेळा मागणी केली.

Borgaswamy's Elgar for permanent stripes | कायमस्वरूपी पट्ट्यांकरिता बोरगाववासीयांचा एल्गार

कायमस्वरूपी पट्ट्यांकरिता बोरगाववासीयांचा एल्गार

Next

ग्रामपंचायतवर धडक : ग्रामसभेचे कामकाज खोळंबले
वर्धा : बोरगाव (मेघे) परिसरातील वॉर्ड क्रमांक १ व ५ मधील रहिवाशांनी कायमस्वरूपी पट्ट्यांची अनेक वेळा मागणी केली. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून नेहमीच टाळाटाळ झाली. यामुळे संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र दिनी सोमवारी आयोजित सभेवरच हल्लाबोल केला. नागरिकांच्या या धडकेमुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.
यावेळी नागरिकांच्या मागण्यांसमोर ग्रामपंचायत प्रशासनाने नमते घेत एकूण चार ठराव घेतले. यात टेकडीवरील घरांची मोजमापे करून ते नमुना आठ वर नोंद घेऊन त्यांना घरपोच नमुना आठ पोहचविणे व त्यांना भोगवटदार म्हणून कर पावती देण्यात येणार आहे. सोबतच राहिलेल्या व पात्र लोकांना शौचालयाचा लाभ सर्वेक्षण करून देण्यात येईल. नागरी सुविधा पुरवण्याबाबत चर्चा करीत नियोजन करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी व राहिलेली पाईपलाईन टाकण्यास लवकरच मंजुरी देण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला. या सभेला सरपंच योगीता देवढे, उपसरपंच येरणे, सचिव सुधाकर आसुटकर यांच्यासह सर्व ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.
बोरगाव (मेघे) येथील टेकडी परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडून गत अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी होत आहे. या मागणीचे निवेदन नागरिकांकडून निवेदनातून ग्रामपंचायत प्रशासनासह जिल्हा प्रशासनालाही देण्यात आले. मात्र याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. परिणामी संतप्त नागरिकांनी आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रा.पं. कार्यालय गाठले. यामुळे ग्रा.पं. सभागृहात आयोजित ग्रामसभेचे कामकाज काही काळ खोळंबले होते.

नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
वर्धा : बोरगाव (मेघे) परिसरातील वॉर्ड १ मधील रहिवाशांना कायमस्वरूपी घराचे पट्टे देण्यात यावे, मालमत्ता कराची पावती देण्यात यावी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, झोपडपट्टी धारकांना स्वस्त धान्य मिळावे याकरिता ग्रामसभेत ठराव घेऊन पाठपुरावा करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
तसेच वॉर्ड क्रमांक ५ मधील तडस यांच्या घरासमोर सांडपाणी साचत आहे. तो खड्डा सध्या अनुचित घटनेला आमंत्रण देत असल्याने तो तात्काळ बुजविण्यात यावा, सातपुते ले-आऊट भागातील अंबुलकर यांच्या घरासमोरी मंजूर रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे, स्मशानभुमी ते सिद्धार्थनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात यावे आदी मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या. या आंदोलनाचे नेतृत्त्व मनोज चौधरी, भाष्कर इथापे यांनी केले. आंदोलनात विनोद सावध, नंदा मेश्राम, निर्मला पोहनकर, ममता फुलमाळी, शिला कांबळे, अंबादास कावळे, कल्पना तांदुळकर, श्याम कावळे, सुरेखा मेश्राम यांच्यासह वार्ड १ व वार्ड ५ मधील शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)

ग्रामपंचायतची तारांबळ
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रा.पं. सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मागण्या घेवून अचानक शेकडो महिला-पुरुष धडकल्याने ग्रा.पं. प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. ग्रामसभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच शहर पोलिसांनी ग्रा.पं. कार्यालय गाठले. ग्रा.पं. कार्यालयात आलेल्या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सरपंचाने पुढाकार घेतला. यावेळी ग्रा.पं. परिसरातच बैठक घेण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्यांवर सरपंच, सचिव व ग्रा.पं. सदस्यांच्या मध्यस्तीने तोडगा काढत आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Web Title: Borgaswamy's Elgar for permanent stripes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.