दोन्ही आरोपी अद्याप फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:28 PM2018-03-31T23:28:12+5:302018-03-31T23:28:12+5:30
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दोन आरोपी पेरॉलवर आले; पण ते परत गेले नाही. यामुळे वर्धा पोलिसंकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दोन आरोपी पेरॉलवर आले; पण ते परत गेले नाही. यामुळे वर्धा पोलिसंकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सुनील उर्फ सन्नी रमेशचंद्र झाडे आणि राहूल रमेशचंद्र झाडे दोन्ही रा. साईनगर अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या दोघांना वर्धा शहर ठाण्यात भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा यांनी सेशन ट्रायल क्रमांक १६६/२००६ प्रकरणात ११ फेब्रुवारी २००९ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर दोन्ही आरोपींची नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली. २२ सप्टेंबर २००९ रोजी कारागृहातून पॅरोल रजेवर आले. नियमित रजा संपल्यानंतर दोन्ही आरोपींनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात परत जाणे बंधनकारक होते. परंतु अद्याप पावेतो दोन्ही आरोपी हे नागपूर कारागृह येथे दाखल झालेले नाही. यामुळे दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात फरार बंदी संबंधाने अनुक्रमे भादंविच्या कलम २२४ अन्वये नोंद करण्यात आलेली आहे.
आरोपी राहुल रमेशचंद्र झाडे याने सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ नागपूर येथे अपिल दाखल केलेली आहे. असे असताना तो न्यायालया समक्ष सुद्धा हजर झालेला नाही. यामुळे दोन्ही आरोपी वर्धा शहरात कुणाच्या नजरेस आल्यास त्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपणीय ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून कळविण्यात आली आहे. किंवा या दोन्ही आरोपींपंदर्भात कोणती माहिती असल्यास ती शहर ठाण्याच्या दुरध्वनीवरही कळविणे शक्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सुजाण नागरिकांना या दोन पैकी कोणी आरोपी दिसल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन आहे.