रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:00 PM2017-11-12T23:00:30+5:302017-11-12T23:00:41+5:30

भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना अस्तित्वात आणली. ग्रामीण भाग चांगल्या रस्ते निर्माण करून शहरांशी जोडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला; .....

Bound next to the treefront tree | रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाला बगल

रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाला बगल

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील प्रकार : एकाही मार्गावर वृक्षलागवड नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना अस्तित्वात आणली. ग्रामीण भाग चांगल्या रस्ते निर्माण करून शहरांशी जोडण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला; पण या योजनेला अभियंतेच बगल देत असल्याने रस्त्यांची गती झाली आहे. शिवाय अर्धवट कामे करूनही देयके अदा केली जात असल्याचे दिसते. या योजनेतील प्रत्येक मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे, असा नियम आहे; पण त्याला बगल देण्यात आली आहे.
पूर्वीची पंतप्रधान ग्रामसडक योजना आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नावाने राबविली जात आहे. काही कर्तव्यतत्पर आमदारांनी त्यांच्या काळात या योजनेचा फायदा करून घेत आपल्या मतदार संघातील गावे शहरांशी जोडले. या माध्यमातून ग्रामस्थांना शहरातील बाजारपेठ जवळ करता आली; पण काहींनी केवळ कुरण म्हणून या योजनेकडे पाहिले. परिणामी, जिल्ह्यातील अनेक गावे रस्त्यांनी जोडली गेली; पण त्या रस्त्यांना दर्जाच राहलेला नाही. देवळी, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू, समुद्रपूर व वर्धा या आठही तालुक्यांत म्हणजे चारही विधानसभा मतदार संघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे झाली; पण केवळ वर्धा मतदार संघातच त्या काळातील रस्त्यांची दर्जेदार निर्मिती झाली. उर्वरित तालुक्यांतील रस्त्यांचा दर्जा अत्यंत सूमार असल्याचे पाहणीमध्ये दिसून आले होते. याबाबतची पाहणी खासदार व अधिकाºयांनी केली होती. यात रस्त्यांचा दर्जा पाहून अभियंत्यांना धारेवरही धरण्यात आले होते. असे असले तरी रस्त्याच्या कामांत सुधारणा करण्यात आलेली नाही. परिणामी, ग्रामस्थांना शहरात जाताना अनेक यातना सहन कराव्या लागतात. याच प्रकारामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा निधी काही वर्षे बंदही करण्यात आला होता. आता तिच योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नावाने राज्य शासनामार्फत राबविली जात आहे. यंत्रणा मात्र तिच ठेवण्यात आलेली आहे. यामुळे आताही रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत.
या योजनेतील रस्त्यांची निर्मिती करीत असताना बांधकाम पूर्ण करीत असताना रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे, असा नियम घालून देण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा नाली आणि वृक्षारोपण केले नसेल तर कंत्राटदाराची देयके अदा करू नये, असे नमूद आहे. असे असले तरी याकडे अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत ज्या रस्त्यांची कामे झाली त्या सर्व कामांची देयके वृक्षारोपणापूर्वीच काढण्यात आल्याचे सांगितले जाते. यामुळे कंत्राटदारही निर्ढावल्याचेच दिसून येत आहे. वर्धा ते पुलगाव मार्गावर कवठा ते देवळी या मुरदगाव, सोनेगाव मार्गे रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या दुतर्फा कुठेही वृक्षारोपण करण्यात आलेले नाही. शिवाय या रस्त्याच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारीही संबंधित कंत्राटदार पार पाडताना दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपासून या रस्त्याचे कामच पूर्ण करण्यात आलेले नाही. अद्यापही डांबराचा कोट करण्यात आलेला नसल्याचेच दिसते. परिणामी काही ठिकाणी गिट्टी उघडी पडली आहे तर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्यही दिसून येते. यामुळे जवळचा असला तरी या मार्गाने नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
असाच प्रकार जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाहावयास मिळतो. आता कार्यकारी अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांचा दर्जाही ढासळत असल्याचे दिसून येत आहे. मागील एका तपात तयार झालेल्या रस्त्यांची सध्या दयनिय अवस्था आहे. त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे लक्ष देण्यासही कुणाला वेळ नाही. शिवाय रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडेही दिसून येत आहे. या योजनेतील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणेच गरजेचे झाले आहे.

देखभाल, दुरूस्तीकडेही कानाडोळा
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून निर्माण करण्यात आलेल्या रस्त्याच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराकडे दिली जाते; पण कंत्राटदार त्याकडे दुर्लक्ष करतात. रस्ता खराब झाल्यास अधिकाºयांनी कंत्राटदारांकडून कामे करून घेणे गरजेचे असते; पण अधिकारीही दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्यांनीच प्रवास करावा लागतो, हे वास्तव आहे. शिवाय बांधकाम विभागच शासनाचा पैसा खर्च करून रस्त्यांची दुरूस्ती करतो.
काम पूर्ण होण्यापूर्वीच निघतात देयके
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतो. एकतर रस्त्याचा दर्जा राखला जात नाही. वापरल्या जाणाºया साहित्याची टेस्टींग पैशाच्या जोरावर करून घेतली जाते. परिणामी, निकृष्ट साहित्याचा रस्ता कामात वापर होतो. वृक्षारोपणही केले जात नाही. यामुळे हे काम अर्धवट ठरते. असे असले तरी देयके मात्र तत्पूर्वीच काढली जातात. कमिशनच्या नादात अधिकारीच हे प्रकार करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 

Web Title: Bound next to the treefront tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.