बोरनदीचा गाळ उपसून ‘समृद्धी’ला देणार बळकटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:42 PM2019-03-03T23:42:03+5:302019-03-03T23:42:33+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या महामार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या महामार्गावर बोरनदीचे पात्र उपसून त्यातील साहित्य वापरण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यावर शासनस्तरावर विचार सुरू आहे.
अभिनय खोपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या महामार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या महामार्गावर बोरनदीचे पात्र उपसून त्यातील साहित्य वापरण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यावर शासनस्तरावर विचार सुरू आहे. बोर नदीचे पात्र उपसून त्यातील गाळ, रेती, आदींचा वापर महामार्गाच्या कामासाठी केल्यास बोर नदीपात्रात जलसंचय वाढून या भागातील शेतकऱ्यांसाठी जलक्रांती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
नागपूर जिल्ह्यातून उगम असलेल्या बोरनदीवर बोरी येथे धरण बांधण्यात आले आहे. सेलू, वर्धा व हिंगणघाट या तीन तालुक्यातून ही नदी जाते. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ व विविध जातीच्या वनस्पती वाढून पात्र अतिशय अरुंद झाले आहे. त्यामुळे रस्ता कामासाठी लागणारे गौण खनिज नदीपात्र उपसून त्यातून घेण्यात यावे, अशी मागणी या भागाचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांच्याकडे केली होती.
त्यानंतर या प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावरून वेग देण्यात आला. पाटबंधारे विभागाच्या अख्त्यारित नदी व धरण येत असल्याने याबाबत रस्ते विकास महामंडळालाही पाटबंधारे विभागाने पत्र पाठविले आहे. तसेच खनिकर्म विभागाला रस्ते विकास महामंडळाने नदी उपसा करून रेती, मुरूम, माती उचल करण्याबाबत परवानगी मागितली आहे.
या कामाला परवानगी मिळाल्यास समृद्धी महामार्गासाठी बोर नदीतीलच वाळू, मुरूम, गाळ उपलब्ध होईल. त्यामुळे नदीची स्वच्छता होऊन संपूर्ण नदीचे पात्र खोलीकरण केले जाईल. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बुलडाणा, अकोला जिल्ह्यात झाला असा प्रयोग
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने बुलढाणा, अकोला जिल्ह्यात अनेक रस्त्यांचे बांधकाम केले. या कामासाठी त्या भागातील नदी पात्रातूनच वाळू, गाळ, आणि मुरूम उपसा करून तो रस्ता बांधकामासाठी वापरला. त्यामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला. जवळपास २० ते २५ गावे टँकरमुक्त झालीत, अशी माहिती आहे.
कंत्राटदाराला अडचण
बोर नदीपात्र उपसून त्यातील वाळू, मुरूम, माती रस्ता कामासाठी वापरण्यास शासकीयस्तरावर विचार सुरू आहे. मात्र, समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा वाहतुकीसाठी खर्च वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून याबाबत किती सकारात्मक प्रतिसाद मिळतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.