बी.पी.एल. मधील घरांची अवैध विक्री थांबवा
By admin | Published: April 9, 2017 12:26 AM2017-04-09T00:26:31+5:302017-04-09T00:26:31+5:30
बी.पी.एल. मधील अनेक घरांची अवैधरित्या विक्री केली जात आहे. त्यामुळे खरे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित....
मनसेची मागणी : सीईओंना कार्यवाहीकरिता साकडे
वर्धा : बी.पी.एल. मधील अनेक घरांची अवैधरित्या विक्री केली जात आहे. त्यामुळे खरे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. सदर योजनेतील घरांची याप्रकारे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनातून केली आहे.
या मागणीचे निवेदन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना मनसेचे जिल्हा अध्यक्ष अजय हेडाऊ यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोटफोडे यांनी दिले. ग्रामपंचायत धानोरा अंतर्गत बि.पी.एल. मधील घरांची रजिस्टर विक्री करून शासनाला धोक्यात ठेवून व्यवहार करण्यात आला. यातून शासनाची दिशाभूल केली जात आहे. खोटे कागदपत्रे तयार करून घरांची परस्पर विक्री केली जात आहे. सदर प्रकार येथील सचिवांना माहिती असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
या प्रकारामुळे खरे लाभार्थी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे दोषीवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना श्याम बुरांडे, गोविंद राऊत, नितीन पोटफोडे, शुभम कन्नाके, सूरज कावळे, रूपेश कावळे, गजानन निकुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)