शाखा अभियंत्याकडून प्रेयसीस मारहाण, जिल्हा परिषदेतील प्रकार
By आनंद इंगोले | Published: July 18, 2023 06:14 PM2023-07-18T18:14:23+5:302023-07-18T18:15:34+5:30
पोलिसांत गेले प्रकरण, गुन्हा दाखल
वर्धा : शाखा अभियंता प्रेयसीला टाळायला लागल्याने प्रेयसीने संपर्क साधून थेट जिल्हा परिषद गाठली. या ठिकाणी प्रियकर शाखा अभियंता याची भेट घेतली असता त्याने तिला मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी प्रेयसीने पोलिसांत तक्रार दाखल केली असता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषदच्या आवारात घडली.
प्रेयसी महिला ही विवाहित असून ती आठवर्षापूर्वी पतीपासून विभक्त झाली. तिचे आर्वी हे माहेर असल्याने तिचे आर्वीत जाणे-येणे होते. याच दरम्यान आर्वीत शाखा अभियंता असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांच्याही भेटी गाठी सुरु झाल्या. असे बरेच दिवस चालल्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून प्रियकर प्रेयसीला टाळायला लागला. बरेचदा फोन केल्यानंतरही प्रतिसाद देत नव्हता. अखेर १७ जुलैला प्रेयसीने सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान शाखा अभियंत्यास फोन केला असता त्याने जिल्हा परिषद, वर्धा येथे असल्याचे सांगितले. त्यामुळे भेट घेण्याकरिता प्रेयसी तडक जिल्हा परिषदेत आली. परंतु प्रियकर काही वेळानंतर जिल्हा परिषदेत पोहोचला.
दोघांचीही भेट झाल्याबरोबर प्रियकराने मारहाण सुरु केली असता त्याच्या हातातील कडे प्रियसीच्या डोक्यावर लागून रक्त निघायला लागल्याचे महिलनेते तक्रारीत म्हटले. हे प्रकरण पोलिसात पोहोचताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाद सोडविला. पे्रयसीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर प्रियकर शाखा अभियंता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.