शहरात धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:50 PM2018-06-27T23:50:39+5:302018-06-27T23:51:38+5:30
शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठाकूर यांचे आहे, हे विशेष!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठाकूर यांचे आहे, हे विशेष!
माजी जि.प. सदस्य अमित विजयसिंग ठाकूर हे दोन महिन्यांपासून स्वत:च्या घराचे बांधकाम सुरू असल्याने शेजारीच असलेल्या धोंगडे यांच्या घरी किरायाणे राहत आहे. अमित ठाकूर हे कुटुंबीयांसह गोवा येथे फिरायला गेले असता चोरट्याने त्यांच्या कुलूप बंद घरात प्रवेश करून घरातील आलमारीतून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेल्याचे सांगण्यात आले. बुधवारी गोवा येथून परतल्यावर घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज तेलगोटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
दुसरी घटना शहरातीलच हिंदनगर येथे घडली. तेथील रमेश गुलाब गजभिये (६१) हे कुटुंबीयांसह कर्करोगग्रस्त असलेल्या बहिणीला अमरावती येथे भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, गजभीये यांच्या कुलूप बंद घरात चोरट्याने प्रवेश करून रोख १७ हजार रुपये, एक महागडा कॅमेरा तसेच सोन्या-चांदीचा ऐवज असा एकूण १ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी पथकासह घटनास्थळ गाठले.
दोन्ही प्रकरणात रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
चोरीनंतर आलमारी केली व्यवस्थित बंद
माजी जि.प. सदस्य अमित ठाकूर यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्याने ज्या लोखंडी आलमारीतून सोन्याचा ऐवज लांबविला, त्याच आलमारीत वरच्या कप्प्यात चांदीचे साहित्यही होते; पण चोरट्याने त्याला हातही लावला नाही. शिवाय ज्या आलमारीतून सदर मुद्देमाल चोरून नेला, ती आलमारी चोरट्याने काम फत्ते केल्यानंतर व्यवस्थित बंद करून ठेवली होती. यामुळे चोरटाही तज्ज्ञच होता काय, असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. तत्सम चर्चाही रामनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांमध्ये सुरू होती.
श्वानपथक ठरले अपयशी
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी चोरी झालेल्या घरांची बारकारईने पाहणी केल्यानंतर चोरट्यांबाबतचा थोडातरी सुगावा लागावा या हेतूने श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने तब्बल तासभर दोन्ही घटनास्थळी चोरट्यांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही पाहिजे तसे यश आले नसल्याचे सांगण्यात आले.