पार्सल सेवेला उत्पन्नाचा ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:42 PM2018-04-01T23:42:26+5:302018-04-01T23:42:26+5:30
थील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील रेल्वे स्थानकात रेल्वे विभागाच्यावतीने कार्यरत असलेली पार्सल सेवा मागील पाच वर्षांपूर्वी कमी उत्पन्न मिळत असल्याचे कारण काढून बंद करण्यात आली. या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रेल्वे विभागाने याकडे लक्ष देत ती सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे जाळ्यानुसार विचार केल्यास वर्धा येथील सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून देशाच्या चारही बाजूला रेल्वे जाणे शक्य आहे. तसे होतही आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे २५० कि़मी.चे लोहमार्गचे जाळे आहे. हे लोहमार्गचे जाळे जिल्ह्यातील प्रवाशांसह जिल्ह्याबाहेरील नागरिकांसाठी फायद्याचेच आहे. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा येथे देश-विदेशातील पर्यटक गांधी-विनोबांच्या कार्याची माहिती त्यांचे विचार आत्मसात करण्याकरिता येतात; परंतु, वर्धा जंगशनवर रेल्वे विभागाकडून पार्सल सुविधाच नसल्याने अनेकांचा हिरमोड होत असल्याचे दिसून आले. पार्सल सेवा बंद असली तरी लगेज सेवा सुरू असल्याचे रेल्वे विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पार्सल सेवेचा लाभ घेताना साहित्यासोबत सदर व्यक्तीला जाणे क्रमप्राप्त नसते. मात्र, लगेज सेवेचा लाभ घेताना साहित्यासोबत व्यक्तीला जाणे अनिवार्य असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले. बंद करण्यात आलेल्या वर्धा रेल्वे स्थानकावरील पार्सल सेवा नागरिकांसाठी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी आहे.
पार्सलचे कर्मचारी इतर कामात व्यस्त
ज्या कालावधीत वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागाची पार्सल सेवा सुरू होती. त्यावेळी या विभागात अनेक कर्मचारी कार्यरत होते. ही सेवा बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता रेल्वेच्या इतर विभागात सुरू असलेल्या कामाकरिता वळते केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दोन मिनिटांचा थांबा ठरतोय अडचणीचा
वर्धा रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो रेल्वे गाड्या ये-जा करीत असल्या तरी बहूतांश रेल्वे गाड्यांचा थांबा हा दोन मिनिटांचाच आहे. नागरिकांचे पार्सल रेल्वे गाडीत चढविणे व उतरविणे यासाठी किमान पाच मिनिटांचा थांबा आवश्यक असल्याचे रेल्वेच्या कर्मचाºयांनी सांगितले. वर्धा रेल्वे स्थानकात पार्सल सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करावे, वर्धेकरांची अपेक्षा आहे.
रेल्वे विभागाची पार्सल सेवा सुमारे पाच वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावर सुरू होती. आता लगेज सुविधा नागरिकांना देण्यात येत आहे. रेल्वे विभागाला यातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने ही पार्सल सेवा बंद करण्यात आली असावी.
- एस. के. झा, उप स्टेशन प्रबंधक, वर्धा रेल्वे स्थानक.