रस्ता दुभाजक १३ ठिकाणी ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:38 PM2018-04-03T23:38:25+5:302018-04-03T23:38:25+5:30

शहरातील मुख्य मार्गाची निर्मिती तत्कालीन आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या कार्यकाळात झाली. रस्ता निर्मितीप्रसंगी रस्ता दुभाजक सलग करण्यात आले होते;...

'Break' in road divider 13 places | रस्ता दुभाजक १३ ठिकाणी ‘ब्रेक’

रस्ता दुभाजक १३ ठिकाणी ‘ब्रेक’

Next
ठळक मुद्देमुख्य मार्गाची व्यथा : कुठूनही वळणाऱ्या वाहनांमुळे अपघातांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील मुख्य मार्गाची निर्मिती तत्कालीन आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या कार्यकाळात झाली. रस्ता निर्मितीप्रसंगी रस्ता दुभाजक सलग करण्यात आले होते; पण कालांतराने एक-दीड किमीचे रस्ता दुभाजक तब्बल १३ ठिकाणी ‘ब्रेक’ करण्यात आले. परिणामी, दुभाजकांतील ‘गॅप’ अपघातांचे कारण ठरत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत रस्ता दुभाजक जोडणे गरजेचे आहे.
शहराचे सौंदर्य वाढावे, वाहतूक सुरळीत व्हावी, कुठूनही बेशिस्तपणे वळणारी वाहने थांबावी म्हणून रस्ता दुभाजकांची निर्मिती केली जाते. वर्धा शहरातील बजाज चौक ते शिवाजी महाराज पुतळा या रस्त्यावरही चार-पाच ठिकाणी छेद देत दुभाजकाची निर्मिती करण्यात आली होती; पण कालांतराने मागणीप्रमाणे रस्ता दुभाजकांना छेद देण्यात आले. यामुळे केवळ एक ते दीड किमीच्या रस्त्यावर दुभाजकाचे तब्बल १३ तुकडे झाले आहेत. प्रत्येक गल्ली-बोळासाठी रस्ता दुभाजक तोडण्यात आल्याने बेशिस्त वाहतूक वाढली आहे. वाहने कुठूनही, कशीही वळविली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बजाज चौक ते शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर सर्वाधिक अपघात निर्मल बेकरी चौक, ठाकरे मार्केट तथा शिवाजी चौकात होतात. या तीनही ठिकाणी दुभाजकांमध्ये मोठी गॅप निर्माण झाली आहे. ठाकरे मार्केट परिसरात दिवसभरात तीन ते चार लहान-मोठे अपघात दररोज होतात. काही वर्षांपूर्वी याच चौकात एका बालकाला प्राणास मुकावे लागले होते.
मंगळवारी देखील एका दुचाकी चालक युवतीला वाचविण्याच्या प्रयत्नात चार चाकी वाहन दुभाजकाला धडकले. सुदैवाने युवती बचावली; पण चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. शहरातील मुख्य मार्गावर असे अपघात नित्याचे झाले आहेत. शिवाजी महाराज चौकातही दोन दुभाजकांमध्ये बरेच मोठे अंतर झाले आहे. वास्तविक, रस्ता निर्मितीप्रसंगी एवढे अंतर ठेवण्यात आले नव्हते. तत्कालीन अभियंत्यांनी नियोजनपूर्वक रस्ता व दुभाजकांचे बांधकाम केले होते; पण त्यानंतर मागणीनुसार अनेक ठिकाणचे रस्ता दुभाजक तोडण्यात आले. आता रहदारी वाढल्याने हा प्रकार जीवावर बेतणारा ठरू लागला आहे.
रस्ता दुभाजकांतील अंतर कमी करण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून प्रयत्न केले जातात; पण त्यांच्या बॅरिकेटस्ला वाहन चालक जुमानत नसल्याचे निर्मल बेकरी चौकात दिसून येते. यामुळे बांधकाम विभागानेच दुभाजकांची पाहणी करीत त्यातील अंतर कमी करणे तथा संख्या कमी करणे गरजेचे झाले आहे.
दुचाकी चालक युवती थोडक्यात बचावली
दुभाजकांतील अधिक अंतरामुळे ते अपघातांना कारण ठरत आहे. ठाकरे मार्केटसमोरील दुभाजकांमध्ये मोठे अंतर ठेवण्यात आले आहे. यामुळे येथे दररोजच अपघात होतात. मंगळवारी एक दुचाकी चालक युवती वाहने न पाहताच वळण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, समोरून येणाºया चार चाकी वाहन चालकाने करकचून बे्रक लावल्याने ती बचावली; पण यात चार चाकी वाहन दुभाजकाला धडकल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले.

मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकांमध्ये अधिक अंतर असून अनेक ठिकाणी ते ब्रेक करण्यात आले आहे. ही बाब अपघाताला कारणीभूत ठरत आहे. याबाबत बांधकाम विभागाकडे प्रस्ताव ठेवणार असून प्रसंगी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.

मुख्य रस्त्यावरील दुभाजकांची पाहणी करण्यात येईल. यानंतर योग्य कार्यवाही प्रस्तावित केली जाईल. यासाठी स्वत: प्रयत्न करतो.
- शरद चौधरी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.

बजाज चौक ते शिवाजी चौक हा मुख्य रस्ता असून दुभाजकांतील अंतर व कट अधिक असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येतात. निर्मल बेकरी चौकात बॅरिकेटस् लावलेत; पण इतर ठिकाणही दुभाजकांतील अंतर अधिक असल्याने अपघात होतात. हे टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत तत्सम प्रस्ताव मांडणार आहे. या मार्गावर अधिकाधिक चार ते पाच कट असणे अपेक्षित आहे.
- दत्तात्रय गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वर्धा.

Web Title: 'Break' in road divider 13 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.