समाज माध्यमांमुळे नववर्षात ग्रीटींग कार्ड विक्रीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:11 AM2018-01-02T00:11:47+5:302018-01-02T00:12:06+5:30
२०१७ वर्ष जाऊन २०१८ या वर्षात आगमन झाले. नववर्षानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पूर्वीपासून ग्रीटींग कार्ड वापरण्यात येत होते;....
आॅनलाईन लोकमत
वर्धा : २०१७ वर्ष जाऊन २०१८ या वर्षात आगमन झाले. नववर्षानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पूर्वीपासून ग्रीटींग कार्ड वापरण्यात येत होते; पण गेल्या काही वर्षांत सोशल मिडीयाचे जाळे अधिक विस्तारीत झाल्याने आता ग्रीटींग कार्ड विक्रीला ‘ब्रेक’ लागला आहे. सर्वच जण सोशल मिडीयाच्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा देऊ लागले आहेत. यामुळे २९ डिसेंबरपासूनच नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव माध्यमातून होऊ लागला. यंदा पहिल्यांदाच बळीराजाप्रतीही (शेतकरी) शुभेच्छा नववर्षानिमित्त सोशल मिडीवर दिसून आल्यात.
२०१७ हे वर्ष देशासह राज्यात अनेकांना कठीण व अडचणीचे गेले. भारतात जीएसटी कराची अंमलबजावणी झाल्याने व्यापारी, उद्योगपती, सर्वसामान्य नागरिक व नौकरदार यांना हे वर्ष त्रासदायक ठरले. तसेच शेतकऱ्याच्या कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले. यामुळे शेतकºयाची अडचण झाली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेला २०१७ या वर्षात मोठी कात्री लावण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पाच हजार कोटीचे बजेट ५४ कोटी रुपयांवर आणण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना या वर्षात झाली. तरीही २०१७ या वर्षाला नागरिकांनी उत्साहाने निरोप दिला.
नवीन वर्षाच्या प्रारंभी शुभेच्छा देण्यासाठी पूर्वी भेटकार्ड पाठविण्याची प्रथा प्रचलित होती. दिवाळी व नवीन वर्ष याचे मिळून एकत्रित व एकट्या नव्या वर्षाचे स्वतंत्र भेटकार्ड दुकानात विक्रीसाठी येत होते. याची मोठी मागणीही राहत होती. शिवाय राजकीय नेते व लोकप्रतिनिधी स्वत: भेटकार्ड छापून नागरिकांना शुभेच्छा पत्र पाठवित होते; पण अलिकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर करणारा वर्ग वाढला आहे. यामुळे भेटकार्ड पाठविण्याची प्रथा कालबाह्य झाली आहे. आता सर्वच जण फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉटस् अॅप, इंस्टाग्राम आदींच्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा देताना दिसतात. विविध ग्रुपमध्ये स्वत:चे भेटकार्ड तयार करून नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत असल्याचेही दिसून येत आहे. मोबाईलच्या आगमनानंतर मॅसेजच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची प्रथा रूढ झाली होती; पण आता मॅसेजद्वारे शुभेच्छा देणाºयांची संख्याही कमी झाली आहे. यंदा पहिल्यांदा सोशल मिडीयावर शेतकºयांचेही नवीन वर्ष चांगले जावे, याकरिता विशेष शुभेच्छापर संदेश पाठविण्यात येत आहेत. एकूणच सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरामुळे आता नवीन वर्षाचे स्वागतही यावरच शुभेच्छा देऊन करण्याची प्रथा रूढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
भेटकार्ड पाठविण्याची प्रथा कालबाह्य
कालौघात भेटकार्ड पाठवून शुभेच्छा देण्याची प्रथा मोडित निघाली आहे. आता सर्वच सोशल मिडीयाचा वापर करताना दिसतात. यावरील संदेशही मनोरंजक तथा मार्मिक असतात. हल्ली शेतकºयांप्रती कणव दाखवित संदेश पाठविले जातात. यातील ‘मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, २०१८ मध्ये पिकू दे माझ्या शेतकºयाचे रान’ हा लोकप्रिय ठरताना दिसतो.