रस्त्यांचा मोकळा श्वास

By Admin | Published: January 22, 2016 02:57 AM2016-01-22T02:57:29+5:302016-01-22T02:57:29+5:30

शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. बुधवारी बजाज चौक ते शास्त्री चौक परिसरातील

Breathe free of roads | रस्त्यांचा मोकळा श्वास

रस्त्यांचा मोकळा श्वास

googlenewsNext

वर्धा : शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. बुधवारी बजाज चौक ते शास्त्री चौक परिसरातील अतिक्रमण काढले तर गुरूवारी आर्वी नाका परिसरात मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेले अतिक्रमण काढण्यात आले. शिवाय नाल्यांवर टाकलेले पक्के रपटे तोडून जमीन खणून काढण्यात आल्याने रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला.
शहरातील मुख्य मार्गांवर सर्वत्र अतिक्रमण बोकाळले आहे. यात रस्त्यापर्यंत हातगाड्या लावून फळ, भाजी व अन्य वस्तूची विक्री केली जाते. यातच ग्राहकांचीही गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आर्वी नाका परिसरात तर सायंकाळी वाहने काढणेही जिकरीचेच झाले आहे. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरूवारी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या उपस्थितीत आर्वी नाका परिसरातील अतिक्रमण काढले. यात नाल्यांवरील रपटे जेसीबीच्या साह्याने उकरून काढण्यात आले. शिवाय ते फोडून जमीनही खणून काढण्यात आली. आर्वी नाका ते न.प. हद्दीपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
आर्वी नाका परिसरार वडार झोपडपट्टी परिसरात दोन्ही बाजूला असलेल्या नाल्यांवर अतिक्रमण झाले होते. यामुळे त्या दिसत नव्हत्या. गुरूवारी अतिक्रमण हटविण्यात आल्याने तेथे नाल्या असल्याचे दिसून आले. यानंतर रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविताना दुकाने, दवाखाने आदींचे फलकही काढून टाकण्यात आले. याप्रसंगी लाकूड व्यावसायिक महाकाळकर यांच्याकडून पालिकेच्यावतीने दोन हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. शिवाय अनेक व्यावसायिकांनी रस्त्यापर्यंत केलेले सिमेंट काँक्रीटचे बांधकाम तोडण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव केला जात असल्याचा आरोप गुरूवारीही आर्वी नाका परिसरात केला जात होता. अचानक आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नागरिकांतून रोष व्यक्त होत होता. नाल्यांवरील रपटे काढून त्या उघड्या केल्याने पुन्हा अतिक्रमण होणार नाही, अशी अपेक्षा पथकाने व्यक्त केली.
गुरूवारी नगर अभियंता सुधीर फरसोले, आरोग्य निरीक्षक रवींद्र टप्पे, लिलाधर निखाडे, लोहवे, चहांदे, सोमवंशी, कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. ही मोहीम पूढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)

खोदकामामुळे नागरिकांत संताप
४नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाद्वारे बजाज चौक व आर्वी नाका परिसरातील अतिक्रमण काढतानाच तेथील परिसर खणून काढला जात आहे. यामुळे नाल्या उघड्या पडत असून नागरिकांच्या अडचणीत भर पडणार असल्याच्या प्रतिक्रीया उमटत होत्या. आर्वी नाक्यावरील नाल्यांवर असलेले रपटेही तोडण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला; पण पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई शांततेत पार पडली. कारवाईत भेदभाव होऊ नये, अशा प्रतिक्रीयाही नागरिकांकडून व्यक्त केल्या जात होत्या.

भेदभाव होत असल्याचा आरोप
४शहरात बुधवारी बजाज चौक परिसरात तर गुरूवारी आर्वी नाका परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. आर्वी नाक्यावरील एका गॅरेजचे तर रेल्वे स्थानक परिसरातील एक बुकस्टॉल कारवाईतून वगळण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दंडात्मक व जप्तीची कारवाई
४शहरातील अतिक्रमण वारंवार काढले जाते आणि व्यावसायिक पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करूनच व्यवसाय करतात. यामुळे आता पालिकेने पथकाची निर्मिती करीत अतिक्रमणावर ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुन्हा अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्यास जप्ती व दंडात्मक कारवाई होणार आहे.

Web Title: Breathe free of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.