लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:15 PM2018-10-20T22:15:32+5:302018-10-20T22:15:44+5:30
दाखल गुन्ह्यात कुठलीही कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागण्यात आली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाहीची विनंती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दाखल गुन्ह्यात कुठलीही कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागण्यात आली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाहीची विनंती केली. त्या आधारे शनिवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत लाचखोर पोलीस हवालदार अशोक दीक्षित याने लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविल्याने व ते सिद्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार याचा त्याचे चुलत भावासोबत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तक्रारदारोविरूद्ध पोलीस स्टेशन आष्टी येथे त्यांचे चुलत भावाच्या ेतक्रारीवरून योग्य कारवाई करण्यात आली. याच प्रकरणी चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदाराने पोलीस हवालदार अशोक दीक्षित याची भेट घेतली. त्यावेळी दीक्षित याने सदर प्रकरणी कुठलीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदारास पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा यांचेकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीची दखल घेवून ६ आॅक्टोबरला लाच मागणी संबंधाने पडताळणी केली असता अशोक दीक्षित याने ताडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्याचेविरूद्ध पोलीस स्टेशन आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक संशोधन अधिनियम २०१८ च्या कलम ७ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई लाचचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुबलवार, लाचचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामजी ठाकुर, पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, विजय उपासे, सागर भोमले, प्रदीप कुचनकर, कैलास वालदे, अपर्णा गिरजापुरे, स्मिता भगत, श्रीधर उईके आदींनी केली. लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे. लाचेची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.