लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Published: December 22, 2016 12:29 AM2016-12-22T00:29:39+5:302016-12-22T00:29:39+5:30
तालुक्यातील वाबगाव येथील शेतकऱ्याला अर्जावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी तलाठी भीमराव भेंडे यांनी ५०० रुपयांची लाच मागितली.
५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक
देवळी : तालुक्यातील वाबगाव येथील शेतकऱ्याला अर्जावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी तलाठी भीमराव भेंडे यांनी ५०० रुपयांची लाच मागितली. याबाबत शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तलाठी भेंडे याला बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील वाबगाव येथील एका शेतकऱ्याची शेतजमीन गणेशपूर लघु कालव्यासाठी पाटबंधारे विभागाने संपादीत केली. संपादीत खरेदी विवरणपत्राप्रमाणे शेत कोरडवाहू दाखविण्यात आले होते; पण सदर शेत ओलिताचे असल्याने योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्याने विशेष भूसंपादन अधिकारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ वर्धा यांच्याकडे अर्ज केला. यानंतर सदर प्रकरण मंडळ अधिकारी व वाबगावचे तलाठी यांनी पाहणी करीत प्रकरण तयार केले. ते तहसील कार्यालयाचे तलाठी भेंडे यांच्याकडे दिले. शेतकऱ्याने भेंडे यांची भेट घेतली असता त्वरित कार्यवाहीसाठी त्याने ५०० रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने एसीबीला माहिती दिली. यावरून बुधवारी सापळा रचून तलाठी भेंडे याला ५०० रुपये घेताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, रामजी ठाकूर, खल्लारकर आदींनी केली.(प्रतिनिधी)