पूल खचला, दोन गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:31 PM2019-08-12T22:31:14+5:302019-08-12T22:34:54+5:30
तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.
यावर्षीच्या जोरदार पावसामुळे पुलाचा भाग खचल्याने सुकळी -दौलतपूर या दोन गावांतील वहिवाट पूर्णत: ठप्प झाली आहे. यात शेतकऱ्यांसह विद्यार्थी, वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मागीलवर्षी जुलै महिन्यात पावसामुळे याच पुलाचा काही भाग खचला होता. मात्र, या पुलाची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्याला पूर आला आणि पुलाजवळील रस्त्याचा काही भाग पुन्हा जास्त खचत वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांसह वाहनधारकांना वहिवाट कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.
सुकळी गावाजवळून जाणाºया या नाल्याला पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरून पाणी येत असल्याने थोडा जरी पाऊस आला तरी या नाल्याचे पाणी रस्त्याच्या दुतर्फा वरून वाहते. या नाल्यावर सिमेंटच्या पायल्या टाकून थातूरमातूर पुलाचे बांधकाम करण्यात आले; पण त्याचे प्राकलन अद्यापही तयार करण्यात आले नाही. नाल्यावर पलिाचे बांधकाम झाल्यानंतर मागील वर्षीच्या जुलै महिन्यातील पावसाने पुलाचा काही भाग व पुलाच्या जवळील रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे भर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. दरम्यानच्या काळात अनेक लहाने-मोठे अपघातसुद्धा झाले. या वर्षी आलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली असून वाहन काढणे कठीण झाले आहे. तसेच चारचाकी वाहन जात नसल्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांचा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाची तत्काळ पक्की डागडुजी करून मार्ग पूर्ववत करावा व पावसाळा संपताच पुलाचे नवीन बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीन भूमिका
पुराच्या पाण्यामुळे पुलासह रस्त्याचा काही भाग वाहून गेला. यामुळे वहिवाट बिकट झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम आहे. यातच ही समस्या निर्माण झाल्याने शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे व्यथा मांडली. मात्र, काहीही हालचाली होताना दिसून येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.