पुलाअभावी नदीपात्रच बनले मार्ग
By admin | Published: January 12, 2017 12:26 AM2017-01-12T00:26:19+5:302017-01-12T00:26:19+5:30
प्रत्येक गावात रस्ता आणि पूल देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यावर कोट्यावधी रुपयांचे बजेट आहे.
चार गावांची व्यथा : विद्यार्थी पावसाळ्यात पोहून करतात रस्ता पार
गौरव देशमुख वर्धा
प्रत्येक गावात रस्ता आणि पूल देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यावर कोट्यावधी रुपयांचे बजेट आहे. असे असताना हिंगणघाट व समुद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या सीमेवर असलेली साकुर्ली, धानोली, जेजुरी, नांद्रा या गावांना दोन्ही तालुक्याशी जोडणाऱ्या पुलाची प्रतीक्षा आहे. या गावातील नागरिकांना तालुक्याच्या स्थळी जाण्याकरिता जीवावर उदार होवून या नदीतूनच रस्ता काढावा लागत आहे.
यामध्ये सर्वाधिक हेळसांड बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची होत आहे. ही समस्या केव्हा मार्गी लागेल, असा प्रश्न या चार गावातील नागरिकांना पडला आहे. साकुर्ली-धानोली गावाच्या शेजारी धामनदी आहे. तर धानोली, नांद्रा, जेजुरी या गावाच्या शेजारी बोरनदी आहे. या गावातील नागरिकांनी स्वखर्चाने अनेक वेळा बांध तयार केला. या बांधावरून गावकरी ये-जा करायचे; परंतु नदीला पूर येताच तो वाहून जातो. यामुळे नाईलाजास्तव ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून पोहत शेती व शाळेला रस्ता धरावा लागत आहे. सन २००६ मध्ये आलेल्या पुरामुळे धानोली व नांद्रा या दोन्ही गावांना धामनदी व बोरनदीच्या पाण्याने वेढा बसला होता. त्यावेळी या गावातील ग्रामस्थांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले होते.
रस्ता व पुलाकरिता चार गावांतील नागरिकांचा टाहो
साकुर्ली-धानोली या मधोमध धामनदी आहे. धानोली-जेजुरी या मधोमध बोरनदी आहे. धानोलीच्या पूर्वेस व नांद्रा या गावाच्या पश्चिमेस बोरनदी आहे. या गावात रस्ते नाही. नदीवर पूल नाही. या गावात रस्ते देऊन नदी पात्रात पूल बांधण्यात यावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे साकुर्ली, धानोली, जेजुरी, नांद्रा, आष्टा, बावापूर, सांवगी, देरडा, या गावाना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे मागणी केली; परंतु आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे या पूल व रस्त्याकरिता या गावातील नागरिकांचा टाहो कायम आहे.
धानोली, साकुर्ली, जेजुरी, नांद्रा या गावाच्या लगत धामनदी व बोरनदी आहे. मात्र रस्ता व नदीवर पुल नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. तसेच शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत व शेत साहित्य शेतात नेते वेळी नदीच्या पात्रातून जीवघेना प्रवास करावा लागतो. या बाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीला वारंवार मागणी केली. मात्र आश्वासनाच्या पलिकडे काहीही मिळालेले नाही. या नदी पात्रावर पूल झाल्यास सात गावांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- स्वप्नील देशमुख, अध्यक्ष, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी संघटना, वर्धा