ब्रिटीशकालीन कारागृह दीडशे वर्षांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:51 PM2018-06-22T23:51:55+5:302018-06-22T23:52:39+5:30
ब्रिटीश कालीन असलेल्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा कारागृहाने दीड शतकात पदार्पण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान इंग्रजांनी याच कारागृहात एक-दोन नव्हे तर तब्बल १७ दिग्गज पुढाऱ्यांना डांबले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ब्रिटीश कालीन असलेल्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा कारागृहाने दीड शतकात पदार्पण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान इंग्रजांनी याच कारागृहात एक-दोन नव्हे तर तब्बल १७ दिग्गज पुढाऱ्यांना डांबले होते.
वर्धा जिल्हा कारागृहाची स्थापना ब्रिटीशांच्या राजवटीत सन १८६७ मध्ये झाली होती. त्यावेळी कारागृहाला वर्ग ३ चा दर्जा देण्यात आला होता; परंतु, सन १९९४ मध्ये या कारागृहाला वर्ग १ चा दर्जा देण्यात आला. सदर कारागृहाची बंदी क्षमता २५२ असून सध्यास्थितीत तेथे नऊ महिलांसह एकूण ३४३ कैदी आहेत. महिला बंदी कारागृहात दाखल झाल्यावर त्यांचे अॅडमिशन करून महिला विभागात महिला कर्मचारी व महिला तुरुंग अधिकारी याच्या उपस्थितीत अंग झडती घेण्यात येते. त्याच वेळी त्याची मेडीकल हिस्टी जाणून घेत गंभीर आजार असल्यास त्याची नोंद घेतली जाते. इतकेच नव्हे तर महिला बंदींच्या मासिक पाळीची तारीख विचारून त्यांना सॅनिटरी नॅपकीन पुरविल्या जाते. तसेच त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून ज्यांची कुवत वकील करण्याची नाही त्यांना शासनातर्फे वकील पुरविण्याची व्यवस्था करून दिली जाते. उत्कृष्ट भोजन, बंदीवानांच्या माहितीत भर टाकण्यासाठी विविध विषयांची पुस्तके या कारागृहात बंदीवानांसाठी आहेत.
सुदृढ आरोग्य हा हेतू केंद्रस्थानी ठेवून बंदीवानांकडून दररोज योग व व्यायाम करून घेतल्या जातो. महिला बंदीवानांना सामाजिक संघटनांच्या मदतीने स्वयंरोजगारा संबंधिचे प्रशिक्षणही दिले जात असून यात शिवणकाम, ब्युटी पार्लर, रांगोळी रेखाटणे, मेहंदी रेखाटणे आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून बंदीवानांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्नच केला जातो.
सुरक्षेच्या दृष्टीने दारूगोळाही पुरेसाच
सदर कारागृहात अधिकारी व कर्मचारी असे ५१ मनुष्यबळ मंजूर आहे. त्यापैकी सध्यास्थितीत तुरुंगाधिकारी श्रेणी २ हे एक पद रिक्त असून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून या कारागृहात पुरेसा दारूगोळा व शस्त्रसाठा उपलब्ध असल्याचे समजते.
सुमारे चार हेक्टर शेती
येथील कारागृहाचे एकूण क्षेत्रफळ ६ हेक्टर ४३ आर असून त्यापैकी ३ हेक्टर ९४ आर जमिनीवर बंदीवानांकडून शेती करून घेतली जाते. तर २ हेक्टर ४९ हेक्टर जमीन कारागृह परिसर क्षेत्र म्हणून असल्याचे सांगण्यात आले.
विनोबांसह १७ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा कारावास
स्वातंत्र्य लढ्याच्या काळात इंग्रजांनी याच कारागृहात आचार्य विनोबा भावे, शिवराज चुडीवाले, गोपालराव काळे, किशोरीलाल मश्रुवाला, काका कालेलकर, प्रोफेसर भनसाली, श्रीकृष्णदास जाजू, राधाकृष्ण बजाज, कृष्णदास गांधी, आर्य नायकम, तेजराम राघवदास, सदाशिव गंद्रे, आशादेवी आर्यनायकम, डॉ. मुजुमदार, देवचंद्र रामचंद्र, जानकीदेवी बजाज, जे. सी. कुमारप्पा यांनी कारावास भोगला आहे.