आमदारांनी उघडे पाडले निकृष्ट कामाचे पितळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:46 PM2018-01-22T22:46:31+5:302018-01-22T22:47:24+5:30
सावंगी (मेघे) ते बोरगाव (मेघे) बायपास रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : सावंगी (मेघे) ते बोरगाव (मेघे) बायपास रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. सिमेंटऐवजी गिट्टीचाच रस्ता करण्यात आला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून गुणनियंत्रक पथकानेही पाहणी केली. आ.डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी सावंगी ते बोरगाव रस्ता गाठून जनतेसमोर त्याच्या दर्जाचे पितळ उघडे पाडले.
सावंगी ते बोरगाव या बायपास मार्गाकरिता एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. दोन-तीन महिन्यांपूर्वीच सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले. या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. रस्त्याचे पितळ उघडे पडू नये म्हणून सिमेंट रस्त्यावर चुरी टाकण्यात आली आहे. चुरी टाकलेला हा एकमेव सिमेंट रस्ता ठरला आहे. यामुळे आ.डॉ. भोयर व पदाधिकाºयांनी सदर रस्त्यावर पाणी मारून चुरी बाजूला केली. गिट्टी अंथरून त्यावर सिमेंटचे पाणी मारल्याचे रस्त्याची स्थिती पाहिल्यास स्पष्ट होत होते.
तत्पूर्वी आ.डॉ. भोयर यांनी विश्रामगृहात पत्रपरिषद घेतली. यात निकृष्ट कामांना विरोध केल्यामुळे आपण पैसे मागण्याचा आरोप संबधीत कंत्राटदाराने केला. काही दिवसांपूर्वी शहरातील मोठ्या कामांची पाहणी केली. यात निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत वरिष्ठांकडे तथा बांधकाम विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केल्याने कामांची चौकशी झाली. कामाचा दर्जा नसल्याने कार्यवाही झाली. यामुळे काही कंत्राटदार दुखावले गेले असावेत, असे ते म्हणाले. मी कुठलेही बिल कुणालाही दिले नाही. यामुळे कंत्राटदार व अधिकाºयांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. २५ कोटींच्या बॅचलर रोडची वरिष्ठांकडे तक्रार केली. यावर संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई झाली आहे. प्रत्येक कामांना भेटी दिल्या. यात निकृष्ट कामांबाबत तक्रारी केल्यात. कामे चांगली व्हावीत, हाच या मागचा उद्देश होता. लोकप्रतिनिधी तथा अधिकाऱ्यांच्या सूचनांनाही कंत्राटदार दाद देत नसल्याने तक्रारी कराव्या लागल्याचेही आ.डॉ. भोयर यांनी सांगितले. यामुळे सर्व संबंधित कार्यान्वय यंत्रणेकडून प्रत्येक महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात कामनिहाय प्रगती अहवाल मागवावा. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला कार्यप्रगती अहवाल लोकप्रतिनिधी, जनता व माध्यमांसमोर सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
व्हीएनआयटीची मागणी
शहरात अमृत योजनेंतर्गत १०० कोटी रुपयांची कामे केली जात आहेत. ही कामे योग्य पद्धतीने होताना दिूसन येत नाही. रस्ते खोदले जातात; पण ते व्यवस्थित बुजविले जात नाही. अनेक ठिकाणचे पेव्हमेंट काढून खोदकाम केले; पण ते पुन्हा लावले नाही. वास्तविक, ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. यामुळे हा प्रकार थांबविण्यासाठी अमृत योजनेतील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी तथा कामे गुणवत्तापूर्ण व्हावी म्हणून व्हीएनआयटी नागपूर या संस्थेची नियुक्ती करावी, अशी मागणी आ.डॉ. पंकज भोयर यांनी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले आहे.
गुणनियंत्रकांच्या पाहणीत आढळले दोष
आ.डॉ. भोयर यांनी केलेल्या तक्रारीवरून गुणनियंत्रक पथकाने सावंगी ते बोरगाव रस्त्याची पाहणी केली. यात ० ते १५० मीटरपर्यंत रस्त्यावर सिमेंटचे पाणी टाकल्याचे व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे नमूद केले. शिवाय १५० ते ४९१ मीटरपर्यंतच्या रस्त्यावर भेगा गेल्याचे दिसून आले. ० ते २५० मीटरपर्यंतच्या साईडपट्ट्या मुरूमने तर उर्वरित रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती टाकल्याचे दिसून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यात सुधारणा करून फोटोसह माहिती सादर करण्याच्या सूचनाही संबंधित कंत्राटदार व अधिकाºयांना देण्यात आल्यात.