घरजावयानेच साळीला गर्भवती केले; आता २० वर्षे खडी फोडणार
By चैतन्य जोशी | Published: January 24, 2024 08:38 PM2024-01-24T20:38:41+5:302024-01-24T20:39:11+5:30
अतिरिक्त विशेष न्यायाधीशांचा निर्णय
वर्धा : अल्पवयीन साळीचे शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम जावई आरोपी गोविंदा बाबाराव येलेकर (२७, रा. रोहणा ता. आर्वी) यास २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावून ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी २४ रोजी दिला. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पीडितेच्या पुनर्वसनासाठी नुकसानभरपाई देण्याचे आदेशित केले.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी जावई गोविंदा येलेकर हा पीडितेच्या मोठ्या बहिणीचा पती आहे. आरोपी व पीडितेची मोठी बहीण हे पीडितेच्याच घरी राहत होते. पीडितेच्या मोठ्या बहिणीला एक सहा महिन्याची मुलगी होती. पीडिता जेव्हा एकटीच घरी असायची तेव्हा आरोपी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती तिचे शारीरिक शोषण करायचा. आरोपीने अल्पवयीन पीडितेचे अनेकदा शोषण केले. पीडितेच्या आई-वडिलांची प्रकृती ठीक राहत नसल्याने ते रोजमजुरीच्या कामाला न जाता घरी राहत होते. तेव्हा आरोपी त्यांच्यासोबत वाद करीत असायचा. वारंवार शोषण केल्याने पीडिता ही गर्भवती झाली. त्यावेळी तिचे वय १७ वर्षे होते. पीडिता अल्पवयीन असूनही ती गर्भवती असल्याचे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदविले असता आपबीती सांगितली. पोलिसांनी आरोपी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडितेला बाळ झाले ते अशक्त असल्याने काही दिवसांनी ते दगावले. डीएनए अहवालानुसार पीडितेला झालेले बाळ आरोपीपासून झाल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणात पुलगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली राठेड यांनी केला. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. विनय आर.. घुडे यांनी कामकाज सांभाळून यशस्वी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. स्वाती एन. गेडे (दोडके) यांनी मदत केली. तसेच पैरवी सहा. फौजदार अनंत रिंगणे यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली.
शासनातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, पीडितेची आई, वैद्यकीय अधिकारी, रासायनिक विश्लेषक नागपूर यांचा डीएनए अहवाल व इतर साक्षीदार यांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.