राज्याला १८ व्यावरून तृतीय स्थानी आणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:11 AM2019-08-02T00:11:39+5:302019-08-02T00:12:04+5:30
राज्य २०१४ ला १८ व्या स्थानी होते. मात्र, महाराष्ट्राला सध्या आम्ही तृतीय स्थानी आणले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात जि.प. च्या शाळांची स्थिती दयनीय होती; पण आमच्या कार्यकाळात शिक्षणाची स्थिती सुधारली आहे. राज्य सरकारने ३० हजार किमीचे रस्ते तयार केले आहे, तर केंद्र सरकारच्या मदतीने २० हजार किमीचे रस्ते गुळगुळीत करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/आर्वी : राज्य २०१४ ला १८ व्या स्थानी होते. मात्र, महाराष्ट्राला सध्या आम्ही तृतीय स्थानी आणले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात जि.प. च्या शाळांची स्थिती दयनीय होती; पण आमच्या कार्यकाळात शिक्षणाची स्थिती सुधारली आहे. राज्य सरकारने ३० हजार किमीचे रस्ते तयार केले आहे, तर केंद्र सरकारच्या मदतीने २० हजार किमीचे रस्ते गुळगुळीत करण्यात आले आहेत. हा एक विक्रमच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले. आर्वी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घालत भाजप सरकारने केलेल्या विकासाचा पाढाच वाचला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ना.गिरीश महाजन, खा. रामदास तडस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनमुळे, कृषिमंत्री अनिल बोंडे, आ. अनिल सोले, सुधीर दिवे, माजी खासदार विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, जि.प. सभापती नीता गजाम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा नांदुरकर, विजय बाजपेयी, पं.स. सभापती शीला पवार, उपसभापती प्रा. धर्मेंद्र राऊत, सुचिता कदम, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, प्रशांत ठाकूर, सुनील बाजपेयी, विनय डोळे आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ना.गडकरी यांच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात २० हजार कि.मी.चे राष्ट्रीय मार्गाचे काम पूर्ण केले आहे. सिंचनाचे गुणात्मक काम झाले. सिंचन प्रकल्पासाठी कोट्यवधी दिले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाचे काम झाले आहे. याच कामांमुळे सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. विशेष म्हणजे, मागील चार वर्षांच्या कार्यकाळात एकाही शेतकऱ्याच्या कृषिपंपाचे वीजजोडणी कापली नाही. उलट त्यांना वीजोडणी दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या ५ वर्षांत थेट मदत म्हणून ५० हजार कोटी, शिवाय कर्जमाफीही दिली आहे. बोंडअळीने नुकसान केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४३ कोटींची मदत केली, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात काँग्रेस नावाला ठेवू नका
महात्मा गांधी यांनीच स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन करा, असे सांगितले होते. परंतु काँग्रेसने ते मान्य केले नाही. मात्र २०१४ च्या निवडणूकीत मतदारांनीच गांधीचे स्वप्न पुर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि सुपडा साफ केला. आता काही एक-दोन शिल्लक राहिले आहे. त्यांचाही निकाल लावून वर्ध्यात काँग्रेस नावालाही ठेऊ नका, असे आवाहन करीत जनादेश मागितला. या सभेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, माजी खासदार सुरेश वाघमारे, शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर व आ.डॉ.पकज भोयर यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन नगराध्यक्ष अतुल तराळे तर आभार भाजपाचे शहर अध्यक्ष प्रशांत बुरले यांनी मानले. यावेळी भाजपाच्यावतीने मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. आ. भोयर यांनी ११ मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करुन त्या पूर्ण करण्याची मागणी केली.
वर्ध्याच्या सभेत दाखविले फलक
वर्धा येथील सर्कस मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा सुरु असतानाच मध्येच एका व्यक्तीने हातात फलक घेऊन सभामंडपात प्रवेश केला. त्यांच्या हातातील फलक बघून लागलीच पोलिसांनी धाव घेत फलक हिसकाविला. यावेळी हे असे प्रसिद्धीसाठी होतेच, याकडे लक्ष देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ना. महाजन यांनी खाली येऊन मध्यस्थी केली.
राज्यात तहसील निर्मिती करतांना पुलगावचे पहिले नाव असेल
पुलगाव - स्थानिक सर्कस मैदानावर झालेल्या पाच मिनिटाच्या जाहीर सभेत भाषणाला सुरुवात होताच पुलगाव तहसील झालीच पाहीजे, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी राज्यातील तहसील निर्मिती करताना पुलगाव तहसीलचे पहिले नाव असले, असे आश्वासन दिले. तसेच पाच वर्षाच्या विकास कामाचा येथेही लेखाजोखा मांडून पुलगाव वासीयांचा जनादेश मागितला.