शिवरायांचा अवमानप्रकरणी बीआरएसपीचा जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:55 PM2019-01-28T21:55:57+5:302019-01-28T21:56:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भंगला असल्याचे दाखवत भंगारात टाकला आणि या पुतळ्याची किंमत ४० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भंगला असल्याचे दाखवत भंगारात टाकला आणि या पुतळ्याची किंमत ४० रुपये दर्शविण्यात आली. शिवरायांच्या अवमानप्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासह अन्य मागण्यांकरिता बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने जनआक्रोश मोर्चाद्वारे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला. यावेळी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने, उमेश म्हैसकर यांच्यासह अनेकांनी मोर्चाला संबोधित केले. मोर्चातील शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
छत्रपती शिवरायांच्या अवमाननेची घटना हिंगणघाट पंचायत समितीत घडली. याचे सर्वत्र संतप्त पडसाद उमटले. मराठा समाज आणि शिवप्रेमी संघटनांनी आंदोलने केली. हिंगणघाट येथील ठाणेदारांनी मध्यस्थी करीत गटविकास अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा घडवून आणली.
यावेळी गटविकास अधिकाºयांनी घडलेल्या प्रकाराविषयी माफी मागून दोषींवर कारवाईच्या अनुषंगाने कळविण्याचे जाहीर केले. गटविकास अधिकाऱ्यांनी पाच दोषी कर्मचाºयांची नावे पाठविली. मात्र अद्याप दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, वर्षभरापासून रखडलेली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, आदिवासींना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, नझुलवर अतिक्रमित दुकानदारांना कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे आदी मागण्या जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या.
मोर्चात बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, रमेश पाटील जी. एम. खान, चंद्रमणी वानखडे, नीलेश कांबळे, संजय वानखडे, राजू धोटे, विजय थोरावत, प्रमोद सार्जन यांच्यासह शेकडो नागरिकांचा सहभाग होता. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोर्चासाठी शिवाजी चौकात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता मोर्चा चारचाकी वाहनातून गेला.