बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:37 PM2019-03-07T23:37:28+5:302019-03-07T23:37:49+5:30
भारत संचार निगम लिमिटेडच्या तालुक्यातील केबल रस्ता बांधकामादरम्यान तुटल्या. यामुळे दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने शासकीय कार्यालयातील कामाचा खोळंबा झाला आहे. बँकांमधील व्यवहार विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : भारत संचार निगम लिमिटेडच्या तालुक्यातील केबल रस्ता बांधकामादरम्यान तुटल्या. यामुळे दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने शासकीय कार्यालयातील कामाचा खोळंबा झाला आहे. बँकांमधील व्यवहार विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तातडीने दुरुस्ती करून सेवा सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तहसील, पोलीस ठाणे, बाजार समिती, बॅँक आॅफ इंडिया, स्टेट बॅँक, पंचायत समिती कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालये इंटरनेट सेवेने जोडली आहेत. रस्ता बांधकामात केबल तुटल्याने इंटरनेट सुविधा खंडित झाली आहे. घरगुती वापराचे टेलिफोन बंद पडले आहेत. यामुळे दूरध्वनीधारकांनी दुसऱ्या खासगी सेवेला पसंती दिली आहे. बीएसएनएलची केबल लाईन वर्धा येथून आष्टीला जोडण्यात आली आहे. सद्यस्थितीत आर्वी-वर्धा, आष्टी-तळेगाव, आष्टी-साहूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी केबल खंडित झाले आहे. आष्टीला तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना इंटरनेट सुविधेअभावी शासकीय कार्यालयातील कामापासून मुकावे लागत आहे. कारंजा येथील उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधला असता लाईनची जोडणी सुरू असून लवकरच दुरुस्त करू, असे सांगितले.
हा नित्याचाच प्रकार
शासनाने बॅँका व इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध केली आहे. मात्र बीएसएनएलच्या सेवेत सातत्याने बिघाड निर्माण होत असतो. यामुळे वारंवार इंटरनेट सेवा प्रभावित होते. याचाच परिणाम शासकीय कार्यालयातील लिंक सदैव फेल राहत असल्याने विविध कामाकरिता येणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.