कराच्या थकबाकीपोटी बीएसएनएल कार्यालय सील
By admin | Published: March 28, 2017 01:02 AM2017-03-28T01:02:15+5:302017-03-28T01:02:15+5:30
शहरातील बीएसएनएल कार्यालयाकडे पालिकेचा ४७ लाख ६५ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. थकीत कराच्या भरण्याकरिता .....
४७.६५ लाख थकले : नगर परिषदेची कार्यवाही
वर्धा : शहरातील बीएसएनएल कार्यालयाकडे पालिकेचा ४७ लाख ६५ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. थकीत कराच्या भरण्याकरिता बीएसएनएला वारंवार पालिकेच्यावतीने सूचना देण्यात आल्या; परंतु, कराचा भरणा झाला नसल्याने सोमवारी दुपारी पालिकेच्या करवसूली पथकाने बीएसएनएल कार्यालयाला सील ठोकले. यामुळे बीएसएनएल कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २००० पासून शहरातील बीएसएनएल कार्यालयाने वर्धा न.प.च्या मालमत्ता कराचा भरणा केला नाही. यामुळे ४७ लाख ६५ हजार ४३ रुपयांचा कर थकला होता.
कर भरण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष
वर्धा : पालिकेच्या थकीत कराचा भराणा करण्यासाठी पालिकेच्यावतीने बीएसएनएल कार्यालयाला वारंवार सूचना देण्यात आल्या. परंतु, या नोटीसला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी बीएसएनएलचे शहरातील कार्यालय गाठत कराचा भरणा करण्यासंदर्भात प्रतिसाद मिळाला नसल्याने वसूली पथकाने कार्यालयाला सील लावले. ही कार्यवाही वर्धा न.प.चे प्रशासकीय अधिकारी अजय बागरे, कर अधीक्षक रवी जगताप, अशोक वाघ, ज्ञानेश्वर परटक्के, गजानन पेटकर, दिलीप कुथे, सुनील जमाने, राजेश तांबेकर, प्रशांत मेंढे, विजय किनगावकर, वानखेडे, रवी सराह आदींनी केली.(शहर प्रतिनिधी)
संधी मिळताच
बाहेर काढले साहित्य
वर्धा नगर पालिकेचे करवसूली पथक बीएसएनएल कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर सुरूवातील अधिकाऱ्यांची चर्चा झाली. तात्काळ कराचा भरणा केल्यास जप्तीची कार्यवाही करणार नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कराचा भरणा करण्यासाठी योग्य प्रतिसाद न मिळत असल्याने शेवटी जप्तीची कार्यवाही सुरू झाली. यावेळी संधी मिळताच बीएसएनएल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील संगणक, प्रिंटर व रोख रक्कम बाहेर काढत इतर इमारतीत नेऊन ठेवली. एकूण जप्तीच्या कार्यवाहीमुळे बीएसएनएल कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.