बीएसएनएलच्या सदोष सेवेमुळे आॅनलाईन कामे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:23 PM2019-02-28T22:23:37+5:302019-02-28T22:24:12+5:30
भारत संचार निगमच्या सदोष सेवेमुळे मागील पाच दिवसांपासून आॅनलाईन कामे ठप्प झाली आहेत. बँकेसह शासकीय कार्यालयात लिंक नसल्यामुळे मागील पाच दिवसांपासून दररोज बँकेसह ग्रामपंचायत व इतर संबंधित कामाकरिता नागरिकांना महत्त्वाची कामे सोडून कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : भारत संचार निगमच्या सदोष सेवेमुळे मागील पाच दिवसांपासून आॅनलाईन कामे ठप्प झाली आहेत. बँकेसह शासकीय कार्यालयात लिंक नसल्यामुळे मागील पाच दिवसांपासून दररोज बँकेसह ग्रामपंचायत व इतर संबंधित कामाकरिता नागरिकांना महत्त्वाची कामे सोडून कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. असा प्रकार मागील तीन महिन्यांपासून सातत्याने सुरू असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
येथे एकमेव बँक आॅफ महाराष्ट्र असून दहा ते पंधरा गावांतील ग्राहक या बँकेशी जुळलेले आहे. त्यामुळे येथे ग्राहकांची दररोजच गर्दी असते. मागील शुक्रवारपासून लिंकफेलमुळे बँकेची सर्व कामे ठप्प झाली आहेत. ग्राहकांना त्यांचाच पैसा वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. तसेच ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र प्रदान केले जातात. परंतु, लिंक फेलमुळे ही कामेही प्रभावित झाली आहेत. एकंदरीत आॅनलाईन सोयीचे ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत सदोष सेवा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आंजीतही लिंक फेलचा फटका
आंजी (मोठी)- येथील बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत मागील तीन दिवसांपासून लिंक फेल आहे. त्यामुळे ग्राहकांना परत जावे लागत आहे. या बॅँकेला परिसरातील दहा गावे जोडलेली आहे. मात्र, लिंक फेलमुळे कोणतेही व्यवहार होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने नागरिकांना विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले द्यावे लागतात. परंतु, लिंक फेलमुळे ही सर्व कामे प्रभावित झाली आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामावरसुद्धा मोठा परिणाम झाला आहे.
-सुरेंद्र ढोक, ग्रामविकास अधिकारी, केळझर.